spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

  “रोहित पवारांचा बॉम्ब! सिडको जमीन प्रकरणात शिरसाट अडचणीत?”  

 

मुंबई १९  : राज्याचे सामाजिक न्याय मंत्री आणि शिवसेना नेते संजय शिरसाट यांच्यावर गंभीर आरोप झाले आहेत. राष्ट्रवादी (शरद पवार गट) नेते रोहित पवार यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दावा केला की, शिरसाट यांनी सिडको अध्यक्षपदाच्या कार्यकाळात नवी मुंबईतील बिवलकर कुटुंबाला तब्बल ५ हजार कोटी रुपयांची, १५० एकर जमीन देऊन मोठा आर्थिक घोटाळा केला.

रोहित पवार म्हणाले की, शिरसाट यांनी स्थानिक भूमिपुत्रांची फसवणूक केली आणि इंग्रजांशी गद्दारी केलेल्या कुटुंबाशी हातमिळवणी केली. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ त्यांचा राजीनामा घ्यावा.

इतिहास सांगतो की, ब्रिटिश काळात बिवलकर कुटुंबाने मराठा साम्राज्याविरोधात इंग्रजांना साथ दिली होती. त्याबदल्यात त्यांना रोहा, पनवेल, अलिबाग परिसरात मोठी जमीन मिळाली. नंतर १९७१ मध्ये ही जमीन सरकारकडे जमा झाली. परंतु, पुढील काही दशकांत न्यायालयीन लढाईतून व प्रशासकीय दडपशाहीतून ती जमीन पुन्हा हस्तगत करण्याचे प्रयत्न सुरु राहिले. अनेक एमडींनी त्यांची मागणी फेटाळली, मात्र शिरसाट अध्यक्ष होताच निर्णय त्यांच्या बाजूने गेला.

रोहित पवार यांनी आरोप केला की, संजय शिरसाट यांनी या व्यवहारातून थेट आर्थिक फायदा घेतला असून १०० कोटी रुपयांचा ‘मलिदा’ मिळविला आहे. त्यांचा पक्षालाही ४००-५०० कोटींचा लाभ झाल्याचा संशय आहे.

काँग्रेस व शिवसेना (उद्धव गट) या प्रकरणात त्यांच्यासोबत असल्याचे पवार यांनी सांगितले. तसेच, “हा थेट भ्रष्टाचार असून, याची चौकशी स्पेशल टास्क फोर्स किंवा निवृत्त न्यायाधीशांमार्फत झाली पाहिजे,” अशी मागणी त्यांनी केली.

@filephoto

Popular Articles