spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

चीन भारताला खतं, रेअर अर्थ्स आणि टनेल मशीन पुरवायला सज्ज

 

नवी दिल्ली १९ : भारत आणि चीन यांच्यातील द्विपक्षीय चर्चेत सकारात्मक घडामोड नोंदवली गेली. चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांना आश्वासन दिले की त्यांचा देश भारताला आवश्यक असलेली खतं (युरिया, एनपीके, डीएपी), रेअर अर्थ मिनरल्स आणि टनेल बोरिंग मशीन (TBM) पुन्हा पुरवणार आहे. यामुळे दोन्ही देशांमधील संबंध सामान्य करण्याच्या दिशेने पावले उचलली जात आहेत.

मागील महिन्यात चीन दौऱ्यावर गेलेले जयशंकर यांनी या पुरवठ्याचा मुद्दा उपस्थित केला होता. तथापि, सीमा व सीमावादाचा विषय या बैठकीत चर्चेला आला नाही. हा मुद्दा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल आज होणाऱ्या स्पेशल रिप्रेझेंटेटिव्ह डायलॉगमध्ये मांडणार आहेत. परराष्ट्र मंत्री वांग यी आज सायंकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेणार आहेत.

जयशंकर यांनी वांग यांना स्पष्ट केले की भारताची तैवानविषयीची भूमिका बदललेली नाही. जगाप्रमाणेच भारताचे तैवानसोबत केवळ आर्थिक आणि सांस्कृतिक संबंध आहेत.

बैठक सौहार्दपूर्ण वातावरणात झाली असली तरी, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे अप्रत्यक्षरीत्या चर्चेत ठळकपणे उपस्थित होते. वॉशिंग्टनच्या सध्याच्या धोरणांमुळे भारत-चीन दोन्ही देशांवर दबाव येऊ शकतो, याची जाणीव दोन्ही बाजूंनी व्यक्त केली. त्यामुळे परस्पर संवाद राखणे आवश्यक असल्याचे ठरले.

गेल्या वर्षभर चीनने भारताला खतं, रेअर अर्थ्स आणि TBM पुरवठा थांबवला होता. चीनकडून भारताच्या कृषी क्षेत्रासाठी जवळपास ३० टक्के खतं, वाहन उद्योगासाठी रेअर अर्थ मिनरल्स, तसेच रस्ते आणि शहरी पायाभूत सुविधांसाठी टनेल बोरिंग मशीन येतात. त्यामुळे चीनकडून पुरवठा पुन्हा सुरू होणे ही मोठी घडामोड मानली जात आहे.

दरम्यान, सीमा विषयावर आज NSA डोभाल आणि वांग यी यांच्यात सविस्तर चर्चा होणार आहे. विशेषतः ३,४८८ किमी लांबीच्या वास्तविक नियंत्रण रेषेवर (LAC) सैन्य मागे घेणे व तणाव कमी करणे यावर भर असेल. लडाखमधील गस्ती व वादग्रस्त प्रश्न सुटले असले तरी दोन्ही देशांची सैन्यदले अजूनही सीमेजवळ तैनात आहेत. त्यामुळे त्यांना छावणीत परतवणे गरजेचे आहे.

Popular Articles