भंडारा २० : भंडारा जिल्ह्यातील मोहरणा गावात बहिण-भावाच्या नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक घटना घडली आहे. मावस भावाकडून झालेला लैंगिक अत्याचार आणि मावशीच्या नातेवाइकांकडून मिळालेल्या सततच्या धमक्यांमुळे १७ वर्षीय युवतीने १५ ऑगस्ट रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेनंतर परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मृत युवती शिक्षणासाठी गेल्या दोन वर्षांपासून तिच्या मावशीकडे राहत होती. कुटुंबीयांना तिची सुरक्षितता वाटत असताना आरोपी मावस भाऊ राजेश रमेश गजभिये याने तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचे सुसाइड नोटमध्ये नमूद केले आहे. या अत्याचाराबद्दल तिने मावशीकडे तक्रार केल्यानंतर प्रकरण दडपण्यासाठी मावशीनेच तिला धमकावले.
घटनेदरम्यान इतर आरोपींनीही पीडितेला धमकावत ठेवले आणि प्रकरण बाहेर उघड न करण्यासाठी दबाव टाकला. यामुळे त्रस्त झालेल्या युवतीने घरात कोणी नसताना नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत युवतीने पाच आरोपींची नावे नमूद करत त्यांना आपल्या मृत्यूस जबाबदार ठरवले आहे.
पीडितेच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून भंडारा पोलिसांनी आरोपी राजेश रमेश गजभिये, नंदा रमेश गजभिये, राहुल रमेश गजभिये, रमेश गजभिये आणि शालू उर्फ शीतल ओंढरे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी भारतीय दंड संहिता कलम 376 (लैंगिक अत्याचार), 306 (आत्महत्येस प्रवृत्त करणे) आणि 506 (धमकी देणे) अंतर्गत प्रकरण नोंदवले आहे.
या घटनेनंतर भंडारा पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला असून आरोपींना अटक करण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आले आहे. प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
@filephoto








