शिक्षकच विद्यार्थी घडवितात – सतीश चिचघरे

0
62
शिशु वाटिका ताईंची द्विदिवसीय कार्यशाळा संपन्न
गडचिरोली, २१ : समाजात जिवंत व्यक्तींवर काम करणारे दोन प्रमुख व्यक्ती आहेत. एक जो उपचार करतो तो डॉक्टर आणि विद्यार्थी घडवतो तो शिक्षक. शिक्षकांचे हे भाग्य आहे की त्यांना हे पवित्र कार्य करायला मिळते. शिक्षकच विद्यार्थ्यांच्या जीवनाला दिशा देतात आणि विद्यार्थी घडवितात. परंतु शिक्षकांनी स्वतः सतत नवीन शिकत राहिले पाहिजे, असे प्रतिपादन विद्या भारतीचे गडचिरोली जिल्हा अध्यक्ष आणि ग्रीनवूड प्री स्कूलचे संचालक सतीश चिचघरे यांनी केले. विद्या भारती आणि ग्रीनवूड प्री स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यशाळेत समारोपप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर प्रांत शिशु वाटिका प्रमुख श्रीमती निर्मला महाजन, सह प्रमुख श्रीमती वर्षा ताठे, संघटन मंत्री शैलेश जोशी आणि मुख्याध्यापिका संगीता अतकमवार उपस्थित होते. कार्यक्रमात सुरुवातीला राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार कृतीरूप व आनंददायी शिशु शिक्षण व्हावे याचा आग्रह वर्षा ताठे यांनी केला तर मातृभाषेतून शिशु शिक्षण व्हावे याचा आग्रह शैलेश जोशी यांनी केला.
द्विदिवसीय कार्यशाळेत पायाभूत स्तराच्या शिक्षणात झालेले बदल, 12 शैक्षणिक कोपरे, सदगुणांच्या कथा, अभिनय व नृत्य गीते, विविध प्रकारचे क्रियाकलाप, पंचकोश विकास आणि साहित्य निर्मिती या विषयांवर प्रकाश टाकण्यात आला. प्रशिक्षिका म्हणून निर्मला महाजन व वर्षा ताठे यांनी काम पाहिले. कार्यशाळेत परिसरातील पूर्व प्राथमिकच्या सुमारे 25 शिक्षिका उपस्थित होत्या. कार्यशाळेची संपूर्ण व्यवस्था मुख्याध्यापिका संगीता अतकमवार, ग्रीनवूड प्री स्कूलचे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी केली. कार्यशाळेच्या समन्वयक म्हणून राखी चिचघरे यांनी जबाबदारी पार पाडली. आभार प्रदर्शन सोनू कुंभले यांनी केल्यावर शांती मंत्राने कार्यक्रमाची सांगता झाली.