नागपूर २१ : एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मंगळवारी संध्याकाळी एक दुःखद अपघात घडला. कूलरमध्ये पाणी भरताना विजेचा धक्का बसल्याने ३२ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. मृत महिलेचे नाव राधिका संजय यादव असे असून, त्या हिंगणा रोडवरील एसआरपीएफ कॅम्प येथे राहत होत्या.
प्राथमिक माहितीनुसार, मंगळवारी संध्याकाळी सुमारे ५:४५ वाजता, राधिका आपल्या घरातील कूलरमध्ये पाणी भरत होत्या, तेव्हाच कूलरमध्ये विजेचा प्रवाह सुरू असतानाच त्यांना जोरदार विद्युत धक्का बसला. धक्का बसल्यानंतर त्या जमिनीवर कोसळल्या. कुटुंबीयांनी तात्काळ राधिकाला लता मंगेशकर रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले. एमआयडीसी पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून अपघाती मृत्यूची नोंद घेतली आहे. पुढील तपास सुरू असून, घटनेमागील नेमकी कारणमीमांसा करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या अचानक झालेल्या अपघाती मृत्यूमुळे राधिका यादव यांच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे. परिसरातही हळहळ व्यक्त केली जात आहे.



