नागपूर २१ : भविष्य सांगण्याच्या बहाण्याने विवाहित महिलेचा विनयभंग आणि धमकी दिल्याचा प्रकार शहरातील पंचपावली परिसरात उघडकीस आला आहे. या प्रकरणात पोलिसांनी हबीबुल मलिक उर्फ मामा उर्फ लालबाबा अन्वर अली मलिक (55), रा. शांतीनगर, प्रेम नगर याला अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 36 वर्षीय पीडित महिलेने 2023 मध्ये पहिल्या पतीपासून घटस्फोट घेतल्यानंतर दुसरे लग्न केले. तिचा नवरा आरोपी हबीबुलचा ओळखीचा असल्याने हबीबुल त्यांच्या घरी वारंवार येत होता. पतीच्या उपस्थितीत तो “भविष्य सांगण्याचे” नाटक करत असे, मात्र महिलेच्या मनात त्याच्या वागणुकीबद्दल संशय होता. महिलेने आपला संशय नवऱ्याला सांगितला असतानाही त्याने दुर्लक्ष केल्याने आरोपीने संधी साधून, पतीच्या अनुपस्थितीत घरात येणे सुरू केले आणि शारीरिक छळ करण्याचा प्रयत्न केला. त्याने महिलेला लग्नाच्या बहाण्याने पश्चिम बंगालला चलण्याचा दबाव टाकला. जेव्हा तिने विरोध केला, तेव्हा तिला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. अखेर महिलेने धैर्य एकवटून पंचपावली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी हबीबुल मलिकविरुद्ध विनयभंग आणि जीवे मारण्याची धमकी अंतर्गत गुन्हा दाखल करत त्याला अटक केली. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
@filephoto



