नागपूर, ता.२५ : नागपूर महानगरपालिकेच्या सुरेंद्रगढ हिंदी आणि सेमी-इंग्लिश माध्यमिक शाळा, सेमिनरी हिल्स येथे पर्यावरणपूरक गणेशमूर्ती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. मागील १५ वर्षांपासून शाळेमध्ये ही अभिनव परंपरा सुरू आहे. शाळेतील विद्यार्थ्यांनी कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या मार्गदर्शनात व अतिरिक्त आयुक्त वसुमना पंत, अतिरिक्त आयुक्त वैष्णवी बी. यांच्या देखरेखीत मनपा प्रशासन पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी कार्य करीत आहे. त्यानुसार पर्यावरणपूरक गणेश मूर्ती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेत सर्व विद्यार्थ्यांनी शाडूच्या मातीपासून अप्रतिम मूर्ती तयार केल्या. कार्यशाळेच्या प्रभारी मुख्याध्यापिका दीप्ती बिष्ट यांनी मुलांना पर्यावरणाची काळजी घेऊन काम करण्याचा सल्ला दिला. “आपल्या पर्यावरणाचे रक्षण करणे आवश्यक आहे, जेणेकरून आपल्या भावी पिढ्यांना एक स्वच्छ आणि निरोगी वातावरण मिळेल,” असे त्या म्हणाल्या.
याप्रसंगी पारंपारिक मूर्तिकार नाना मिसाळ, अन्विती ग्रुपच्या शेफाली, आशा रमण, प्रणाली बगले, स्वाती जोशी, बरखा जयस्वाल यांच्यासह अनेक शिक्षक, व विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमात सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला.



