संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी : पारंपरिक सणांचा गोडवा लहानग्यांच्या निरागसतेतून अनुभवायला मिळतो. अशाच पारंपरिक सणांपैकी एक असलेला बैल पोळा स्वामी अवधेशानंद शाळा व ज्युनिअर कॉलेजमध्ये आज (शुक्रवार) मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. उद्या शनिवार रोजी शाळेला सुटी असल्याने आजच शाळेत बाल पोळा उत्सव साजरा करण्यात आला.
या विशेष प्रसंगी शाळेचे बाल विद्यार्थी पारंपरिक वेशभूषेत सजून आपापल्या हातांनी तयार केलेल्या लहानग्या बैलांच्या मूर्ती, रथ व सजावटीसह सहभागी झाले. रंगीबेरंगी पोशाख, आकर्षक सजावट, सुंदर रांगोळी आणि मुलांच्या आनंदी चेहऱ्यामुळे संपूर्ण वातावरण सणमय झाले होते.
या कार्यक्रमाला शाळेच्या प्राचार्या डॉ. ईशा मुदलियार यांच्यासह शिक्षक-शिक्षिकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता. प्राचार्या डॉ ईशा मुदलियार यांनी विद्यार्थ्यांना बैल पोळ्याचे सांस्कृतिक व कृषी परंपरेतील महत्त्व समजावून सांगितले. शेतकऱ्यांच्या जीवनातील बैलाचे स्थान, त्यांच्या श्रमाचे मूल्य आणि निसर्गाशी असलेले नाते यावर प्रकाश टाकण्यात आला.
या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये केवळ सणांविषयीची ओढच नाही तर संस्कृती जपण्याची जाणीव निर्माण होत असल्याचे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले



