spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

मायग्रेन आणि डोकेदुखीतला फरक कसा ओळखायचा ?

काहीजणांना डोकेदुखीचा त्रास जाणवतो, दुखण्यामुळे सुचत नाही, काही करता येत नाही अशी परिस्थिती होते.

तणावामुळे किंवा अन्य कारणांमुळे जेव्हा डोकेदुखी सुरू होते, तेव्हा सामान्य डोकेदुखी आणि मायग्रेनचा अटॅक यांतला फरक ओळखणं अनेकदा कठीण जाऊ शकतं. योग्य उपचार करता यावेत यासाठी यातील फरक समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. सामान्य डोकेदुखी आणि मायग्रेनमधला फरक कसा ओळखायचा ते पाहूया.

डोकेदुखीमधे, व्यक्तीला वेदना आणि त्यासोबतच डोक्यावर दाब पडल्यासारखं वाटतं. डोकेदुखीत सौम्य वेदना जाणवतात, पण तीव्रता कमी-अधिक असू शकते. हा सामान्य प्रकारचा डोकेदुखीचा त्रास प्रामुख्यानं कपाळ, कानशिलांचा भाग आणि मानेच्या वरच्या भागात होतो आणि तो पाच मिनिटांपासून ते चार तासांपर्यंत टिकू शकतो.

जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, सामान्य डोकेदुखीचं कारण अनेकदा तणाव असतं. याव्यतिरिक्त, चिंता, स्नायूंचा ताण आणि डोळ्यांवर येणारा ताण, एसिडिटी यांसारखे घटकही यासाठी कारणीभूत ठरू शकतात.

मायग्रेन – सामान्य डोकेदुखीपेक्षा मायग्रेनचं दुखणं तीव्र असतं. यात डोकेदुखीसोबतच मान आणि खांद्यामधे वेदना, मळमळ, कानाच्या मागे किंवा वरच्या भागात वेदना, दृष्टीशी संबंधित समस्या, प्रकाश – आवाजाची संवेदनशीलता, उलट्या आणि स्नायूंचा ताण यांसारखी इतर लक्षणंही दिसून येतात.

मायग्रेनच्या त्रासाचे दोन प्रकारांत वर्गीकरण केलं जातं. एक म्हणजे ऑरा – aura नसलेला मायग्रेन आणि ऑरा असलेला मायग्रेन. इथे ऑरा म्हणजे मायग्रेनचा झटका येण्यापूर्वी दहा ते तीस मिनिटं आधी दिसणारी शारीरिक लक्षणं. या लक्षणांमधे मानसिक गोंधळ किंवा सतर्कतेचा अभाव, विचार करण्यास अडचण येणं, प्रकाशाचे झोत किंवा विचित्र रेषा दिसणं, हात-पायांना मुंग्या येणं किंवा बधीरपणा जाणवणं, तसंच विचित्र वास किंवा चव येणं असे प्रकार होऊ शकतात.

मायग्रेन ओळखण्यासाठी हे लक्षात ठेवा –

मायग्रेनमधे डोकं प्रचंड दुखतं – कधीकधी वेदना खूप तीव्र असतात की तातडीनं वैद्यकीय मदत घेण्याची गरज भासू शकते. बहुतेक वेळा, वेदना डोक्याच्या एकाच बाजूला जाणवतात.

अति वेदनांमुळे दैनंदिन कामांमधे अडथळा येऊ शकतो. हा त्रास तीन तासांपासून ते तीन दिवस टिकू शकतो. डोकेदुखी, मायग्रेनचा त्रास वारंवार जाणवत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Popular Articles