खर्च २५०० कोटी रुपये — नितीन गडकरी यांची घोषणा
जबलपूर/नागपूर २५ : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी जबलपूर येथे आयोजित कार्यक्रमात एक महत्त्वाची घोषणा केली. त्यांनी सांगितले की, सावनेर-छिंदवाडा-सिवनी या मार्गाचे चौपदरीकरण केले जाईल, ज्यावर अंदाजे ₹२५०० कोटी रुपये खर्च होणार आहेत. गडकरी यांनी स्पष्ट केले की, या चौपदरीकरणामुळे स्थानिक वाहतूक सुलभ होणार असून औद्योगिक आणि कृषी उत्पादनांची वाहतूक देखील अधिक वेगाने आणि सुरक्षितपणे होईल. यामुळे परिसरातील रोजगार संधी वाढतील आणि प्रादेशिक विकासाला चालना मिळेल. याचबरोबर, प्रसिद्ध जामसावली हनुमान मंदिर पर्यंत भाविकांना सहज पोहोचता यावे, यासाठी हा रस्ता “हनुमान पथ” म्हणून चार पदरी विकसित केला जाणार आहे. मंदिर संस्थेच्या विनंतीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. गडकरी यांनी सांगितले की, प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर नागरीकांना जलद, सुरक्षित आणि दर्जेदार रस्ते सुविधा मिळणार आहेत. या विकासामुळे छिंदवाडा, सिवनी आणि परिसरातील जिल्ह्यांचा सामाजिक व आर्थिक विकासही गतीने होणार आहे.



