जुगार आणि बेकायदेशीर दारू विक्रीवर नागपूर पोलिसांची मोठी कारवाई, लाखोंचा मुद्देमाल जप्त

0
57

 

नागपूर २५ : पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांच्या आदेशानुसार नागपूर शहर आणि ग्रामीण भागात रात्री उशिरा कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आले. या मोहिमेअंतर्गत खापरखेडा पोलिसांनी जुगार खेळणाऱ्या टोळीवर आणि बेकायदेशीर दारू विक्रेत्यांवर धडक कारवाई केली. दहेगाव रंगारी येथील दर्शनवाडी लॉनमध्ये काही व्यक्ती पत्त्यांवर पैसे लावून जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळताच, त्वरित छापा टाकण्यात आला. अंधाराचा फायदा घेत काही जुगारी घटनास्थळावरून फरार झाले, मात्र तीन आरोपींना अटक करण्यात आली. या कारवाईत पोलिसांनी ३ मोबाईल फोन, ७ वाहने आणि  रु  १८,००० रोख रक्कम जप्त केली असून, एकूण मुद्देमालाची किंमत सुमारे  रु  ६.९३ लाख इतकी आहे. याच कोम्बिंग ऑपरेशनदरम्यान वॉर्ड क्रमांक ३, खापरखेडा येथे बेकायदेशीर देशी दारू विक्री करणाऱ्या एका व्यक्तीसही अटक करण्यात आली असून, आरोपीकडून रु ४,००० किमतीची देशी दारू जप्त करण्यात आली. पोलिस प्रशासनाने सांगितले की, सणासुदीच्या काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अशा प्रकारच्या कोम्बिंग ऑपरेशन्स नागपूर जिल्ह्यात सातत्याने सुरू राहतील.