नागपूर २५ : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फाउंड्रीमेनच्या (IIF) 74व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी फाउंड्री उद्योगाने पारंपरिक इंधनाऐवजी पर्यावरणपूरक ग्रीन हायड्रोजन स्वीकारण्याचे आवाहन केले.
गडकरी म्हणाले की, भारतीय फाउंड्री उद्योगात प्रचंड संधी असून निर्यात वाढवून आणि आयात कमी करून आपण जागतिक स्तरावर अग्रणी स्थान मिळवू शकतो. यासाठी पेट्रोल, कोळसा यांसारख्या पारंपरिक इंधनांचा वापर कमी करून ग्रीन हायड्रोजन, बायोफ्युएल आणि सीएनजी यांसारख्या पर्यावरणपूरक पर्यायांकडे वळणे गरजेचे आहे.
त्यांनी सांगितले की, ग्रीन हायड्रोजनचा वापर केल्याने उत्पादन खर्च कमी होईल, आयात-निर्यात क्षमता वाढेल आणि उद्योगाला नवीन स्पर्धात्मक धार मिळेल.
सभेदरम्यान इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फाउंड्रीमेनचे अध्यक्ष नवनीत अग्रवाल उपस्थित होते. गडकरी यांनी या वेळी ऑटोमोबाईल क्षेत्रातील प्रगतीवरही प्रकाश टाकला. त्यांनी नमूद केले की, 2014 मध्ये देशातील ऑटोमोबाईल उद्योगाची उलाढाल 12 लाख कोटी रुपये होती, तर ती आता 22 लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहे. गेल्या सहा महिन्यांत भारताने जपानला मागे टाकत जगात तिसऱ्या क्रमांकाचे ऑटोमोबाईल बाजारपेठेचे स्थान मिळवले आहे. पहिल्या क्रमांकावर अमेरिका आणि दुसऱ्या क्रमांकावर चीन आहे. आगामी काळात भारताने या क्षेत्रात पहिले स्थान मिळवणे हे उद्दिष्ट असल्याचे गडकरींनी स्पष्ट केले.
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फाउंड्रीमेन (IIF) ची स्थापना 1950 साली झाली असून ही संस्था देशभरातील फाउंड्री उद्योग, ग्राहक आणि पुरवठादार यांच्यातील दुवा म्हणून कार्यरत आहे. संस्थेचे मुख्यालय कोलकाता येथे असून दिल्ली, मुंबई आणि चेन्नई येथे प्रादेशिक कार्यालये, तर पुणे, चेन्नई, दिल्ली आणि कोलकाता येथे चार उत्कृष्टता केंद्रे कार्यरत आहेत.



