रामटेक २५ : रामटेक येथील कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. हरेराम त्रिपाठी यांचा उत्तर प्रदेशातील महू येथे शनिवारी पहाटे झालेल्या भीषण अपघातात मृत्यू झाला. या अपघातात त्यांच्या पत्नी बदामी देवी (५२) यांचाही जागीच मृत्यू झाला असून, ही दुर्दैवी घटना शैक्षणिक वर्तुळासाठी मोठा धक्का ठरली आहे.
शनिवारी पहाटे अंदाजे ५.४० वाजता त्रिपाठी दांपत्य आपल्या इनोव्हा कारने कुशीनगर जिल्ह्यातील चकिया बाघुजघाट येथील मूळ गावी जात होते. वाराणसी-गोरखपूर चार पदरी महामार्गावर, महू येथील दोहरीघाट पोलिस ठाण्याच्या हद्दीत, उभ्या असलेल्या एका ट्रेलरला त्यांची कार भीषणपणे धडकली. धडक इतकी जोरदार होती की, प्रा. हरेराम त्रिपाठी व त्यांच्या पत्नीचा जागीच मृत्यू झाला, तर चालक वैभव मिश्रा (३५) गंभीर जखमी झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सलग प्रवासामुळे चालक वैभव मिश्रा थकला होता. त्याला झोप येत असल्याने प्रा. त्रिपाठी यांनी स्वतः कार चालवायला घेतली होती. प्रवासादरम्यान महामार्गावर एका पेट्रोल पंपासमोर चाक पंक्चर झाल्याने ट्रेलर उभा होता, परंतु अंधार व वेगामुळे तो त्रिपाठी यांच्या नजरेस आला नाही, परिणामी ही दुर्घटना घडली.
अपघाताची माहिती मिळताच दोहरीघाट पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांच्या मदतीने गाडीत अडकलेले मृतदेह बाहेर काढण्यात आले. मृतदेह जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले असून, जखमी चालकाला प्राथमिक उपचारानंतर जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. पोलिसांनी इनोव्हा कार व ट्रेलर जप्त करून पुढील तपास सुरू केला आहे.




