नागपूर दि. २६ : महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने वीज ग्राहकांना दिवसा वापरल्या जाणाऱ्या विजेवर प्रति युनिट 80 पैशांची सवलत जाहीर केली आहे. या सवलतीचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला फक्त टाइम ऑफ डे (टीओडी) मीटर बसवून घ्यावा लागेल. नागपूर परिमंडलात, आतापर्यंत 3 लाख 34 हजारांहून अधिक ग्राहकांनी टीओडी मीटरचा वापर सुरू केला आहे आणि त्यांना तब्बल 22 लाख 72 हजार रुपयांपेक्षा जास्त रकमेची सवलत मिळाली आहे.
यात नागपूर जिल्ह्यातील ग्राहकांना 21 लाख 29 हजाराची तर वर्धा जिल्ह्यातील ग्राहकांना 1 लाख 43 हजार रुपयांची सूट मिळाली आहे. त्यामुळे ज्या ग्राहकांनी हे मीटर लावले आहेत, त्यांचे वीजबिल कमी येण्यास मोठी मदत झाली आहे. ऑगस्ट महिन्यातही, आत्तपर्यंत 79 हजारांहून अधिक ग्राहकांनी 14 लाख 89 हजार रुपयांची सवलत मिळवली आहे, आणि ही संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
महावितरणच्या नागपूर परिमंडलात टीओडी मीटरचा वापर करून वीजबिलात सवलत घेणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे. ऑगस्ट महिन्यात सद्यस्थितीत एकूण 79 हजार 54 ग्राहकांनी 14 लाख 89 हजार 4 रुपयांची सवलत घेतली आहे. तर जुलै महिन्यात वर्धा जिल्ह्यातील 11 हजार 176 तर नागपूर जिल्ह्यातील 88 हजार 737 ग्राहकांसह परिमंडलातील एकूण 99 हजार 913 ग्राहकांना 7 लाख 83 हजार 565 रुपयांची सवलत मिळाली आहे. महावितरणकडून सर्वत्र हे मीटर लावण्याचे काम मोठ्या प्रमाणात सुरु असून बिलींग सायकलप्रमाणे टीओडी वीजदराची सवलत मिळविणा-या ग्राहकांचीन संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
महावितरणकडून वीज ग्राहकांना बसविण्यात येत असलेले स्मार्ट टीवोडी मीटरमुळे वीज ग्राहकांना अचूक आणि वेळेत वीज बिल मिळत आहे. सरासरी वीज बिल, फॉल्टी मीटर बिल यासारख्या तक्रारींमध्ये मोठी घट झाल्याचे दिसून आले आहे. वापराएवढेच अचूक वीजबिलाची नोंद करणाऱ्या स्मार्ट टीवोडी मीटर बसविण्यासाठी नागपूर परिमंडलात 461 ग्राहकांनी स्वतःहून महावितरणकडे मागणी केली आहे. यात नागपुर जिल्ह्यातील 387 तर वर्धा जिल्ह्यातील 74 ग्राहकांचा समावेश आहे.
टीओडी मीटरमुळे तुम्हाला तुमच्या वापरावर आधारित अचूक बिल मिळते. त्यामुळे सरासरी बिलांच्या आणि जुन्या मीटरमुळे येणाऱ्या तक्रारी कमी झाल्या आहेत. दिवसा वीज वापरल्यास प्रति युनिट 80 पैसे ते 1 रुपयापर्यंतची सवलत मिळते. यामुळे तुमच्या वीजबिलात थेट बचत होते. महावितरण हे स्मार्ट टीओडी मीटर ग्राहकांना मोफत लावून देत आहे. त्यामुळे तुमच्यावर कोणताही आर्थिक भार येत नाही. हे मीटर अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित असल्यामुळे त्याचे मासिक रीडिंग आपोआप घेतले जाते. यासाठी कोणाच्याही हस्तक्षेपाची गरज नाही.
हे मीटर ग्राहकांच्या फायद्यासाठीच आहेत. महावितरणने नागपूर परिमंडलात मॉन्टेकार्लो या कंपनीला हे मीटर लावण्याचे काम दिले आहे. टीओडी मीटरबद्दल काही शंका किंवा प्रश्न असल्यास, महावितरणने दिलेल्या https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLScOJpHweK6Zei9XrAgK80eObhRPl04-WKVP3flZnXFMcX1wzQ/viewform या गुगल फॉर्म लिंकवर किंवा क्यूआर कोड स्कॅन करून ग्राहक आपली तक्रार नोंदवू शकता.



