नागपूर, २६ : शहरातील सर्वात गजबजलेल्या आणि प्रमुख व्यावसायिक केंद्रांपैकी एक असलेल्या इतवारी-गांधीबाग परिसरातील वाहतूक कोंडीवर नियंत्रण मिळवण्यासाठी नागपूर वाहतूक पोलिसांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. बाजारपेठेतील बेशिस्त वाहतूक आणि वाहनांच्या वाढत्या गर्दीमुळे नागरिक व व्यापाऱ्यांना त्रास सहन करावा लागत होता. वाहतूक विभागाने जाहीर केलेल्या आदेशानुसार, २५ ऑगस्ट २०२५ ते २४ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत दररोज सकाळी १० ते रात्री १० वाजेपर्यंत इतवारी-गांधीबाग परिसरात ऑटो, रिक्षा, चारचाकी आणि जड वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. यावेळी फक्त दुचाकी आणि पादचाऱ्यांनाच प्रवेश दिला जाईल.
वाहतूक सुधारण्यासाठी इतवारी धान्य बाजार, मस्कसत मार्ग, टांगा स्टँड मार्ग, गांधीबाग तसेच होळकर चौक ते गांधीबाग, शहीद चौक ते इतवारी कापड बाजार आणि रुईकर मार्ग यासारख्या मुख्य रस्त्यांवर एकेरी वाहतूक व्यवस्था लागू करण्यात आली आहे. तसेच, बाजार परिसरात नो-पार्किंग झोन तयार करण्यात आले असून, त्या ठिकाणी कोणत्याही वाहनाचे पार्किंग करण्यास मनाई आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
बाजारातील दुकानांमध्ये माल पुरवठा करणाऱ्या वाहनांना सकाळी १० वाजण्यापूर्वी आणि रात्री १० नंतर प्रवेश दिला जाणार आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांनी माल वाहतुकीचे नियोजन त्या वेळेनुसार करावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी विशेष अधिकारी आणि कर्मचारी तैनात करण्यात आले असून, वाहतूक नियंत्रणासाठी योग्य दिशादर्शक फलक व अडथळेही लावण्यात येत आहेत. वाहतूक पोलिसांनी नागरिक, वाहनचालक व दुकानदारांना नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले आहे. या उपाययोजनांमुळे वाहतूक कोंडीची समस्या दूर होईल, पादचाऱ्यांना सुरक्षिततेची हमी मिळेल आणि बाजारपेठेतील वातावरण अधिक शिस्तबद्ध व आरामदायी बनेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.



