नागपूर येथील गणेश मंडळाकडून भक्तीसह आरोग्याचाही होणार जागर

0
58

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून अभिनव उपक्रम

जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांचे रक्तदानासाठी गणेश मंडळांना आवाहन

नागपूर, २७ :  सार्वजनिक गणेश उत्सवाच्या माध्यमातून होणाऱ्या भक्ती जागराला आता आरोग्य जागराची जोड देण्यासाठी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा व गणेश मंडळे पुढे सरसावली आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून श्रीगणेशा आरोग्याचा हे अभियान मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या माध्यमातून जिल्ह्यात राबविले जात आहे. दिनांक 27 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर या कालावधीत समुदाय आरोग्य शिबीरावर या अभियानाद्वारे भर राहील असे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी सांगितले.

जिल्ह्यातील सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाचे प्रतिनिधी व शासनाशी निगडीत असलेल्या रुग्णालयातील डॉक्टारांची या अभियानाबाबत नियोजन भवन येथे व्यापक बैठक संपन्न झाली. या बैठकीत जिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकर यांनी  सूचना दिल्या. यावेळी अपर जिल्हाधिकारी प्रविण महिरे, निवासी उपजिल्हाधिकारी अनुप खांडे, मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे डॉ. सागर पांडे, आदी उपस्थित होते.

या मोहीम कालावधीत  प्रत्येक वार्डनिहाय त्या-त्या भागातील शासनाशी निगडीत असलेल्या प्रतिथयश रुग्णालयातील डॉक्टरांची टिम प्राथमिक तपासणी करणार आहेत. या तपासणीत कोणाचे गंभीर आजार निदर्शनास आले तर अशा रुग्णांवर शासनाच्या विविध योजनांतर्गत तत्काळ उपचाराची सुविधा दिली जाईल, असे बैठकीत निश्चित करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी सर्व भाविकांना रक्तदान करण्याचे आवाहन केले.

जिल्ह्यात मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष अंगीगृत रुग्णालयासमवेत 79 महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेत अंगीकृत रुग्णालये आहेत.  धर्मादाय रुग्णालये 30 आहेत. नागपूर येथील 2 शासकीय व 2 खाजगी वैद्यकीय महाविद्यालय, 1  सार्वजनिक आयुर्वेद महाविद्यालय, सार्वजनकि आरोग्य विभागाच्या अखत्यारीतील आरोग्य संस्था मधील डॉक्टरांच्या पथकामार्फत आरोग्य शिबीरात तपासणी केली जाईल.  सूमारे 900 सार्वजनिक गणेश मंडळे या उपक्रमात सहभागी होतील अशी अपेक्षा या बैठकीत व्यक्त करण्यात आली.