spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

नागपूरच्या रामझुला उड्डाणपुलाला गंभीर भेगा

हमी कालावधीतच पुलांची बिकट स्थिती; अपघातांचा धोका वाढला

नागपूर, २७ : नागपूरमधील शहराच्या पूर्व आणि पश्चिम भागांना जोडणारा सर्वात महत्वाचा समजला जाणारा रामझुला उड्डाणपूल गंभीर अवस्थेत आला आहे. पुलावर दोन ठिकाणी मोठ्या भेगा पडल्या असून, एका ठिकाणी ४ इंच (१०० मिमी) आणि दुसऱ्या ठिकाणी ३ इंच (७५ मिमी) इतक्या रुंदीच्या दरी निर्माण झाल्याचे समोर आले आहे. या भेगा तात्पुरत्या बुजवण्यासाठी पेस्ट आणि रबरचा वापर करण्यात आला होता, मात्र काही दिवसांतच ती सामग्री निघून गेल्याने परिस्थिती अधिक धोकादायक बनली आहे.

गुणवत्तेवर गंभीर प्रश्न; जबाबदारीची टोलवाटोलवी सुरू

ही बाब समोर आल्यानंतर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) यांनी नागपूर महानगरपालिका, मेट्रो प्रकल्प आणि कंत्राटदार कंपनी अ‍ॅफकॉन्स यांना तातडीने सूचना दिल्या आहेत. कंत्राटदार कंपनीने पुलाची पाहणी करून अहवाल सादर केला आहे.

विशेष म्हणजे, हा पूल हमी कालावधीत असूनही इतक्या गंभीर भेगा पडल्या आहेत. यामुळे बांधकामाच्या गुणवत्तेबाबत मोठे प्रश्न उपस्थित होत आहेत. एमएसआरडीसीने स्पष्ट केले आहे की, हा पूल २०२० मध्ये नागपूर महानगरपालिकेकडे हस्तांतरित करण्यात आला होता. त्यामुळे आता दुरुस्ती आणि देखभाल याची संपूर्ण जबाबदारी महानगरपालिका आणि कंत्राटदार कंपनीची आहे.

८ वर्षांचा उशीर, वाढता खर्च आणि तांत्रिक त्रुटी

रामझुला उड्डाणपुलाचे बांधकाम तीन वर्षांत पूर्ण होणार होते, पण प्रत्यक्षात हा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी ८ वर्षांहून अधिक कालावधी लागला. एमएसआरडीसीच्या देखरेखीखाली खाजगी कंत्राटदार अ‍ॅफकॉन्स यांनी हे बांधकाम केले होते. या प्रकल्पाला सुरुवातीपासूनच खर्चवाढ, तांत्रिक त्रुटी आणि उशीर यामुळे वादांनी वेढले होते.

तज्ज्ञांचा इशारा – अपघातांचा धोका वाढला

तज्ज्ञांच्या मते, पुलाच्या दोन स्पॅनमधील दरी ४० मिमी पर्यंत मान्य असते. मात्र, सध्या पडलेल्या १०० मिमी आणि ७५ मिमी च्या भेगा मानकांपेक्षा दुपटीहून अधिक आहेत. त्यामुळे वाहनचालकांनी पुलावरून जाताना अत्यंत काळजी घेण्याची गरज आहे.

सध्या एमएसआरडीसी, मनपा आणि मेट्रो प्रकल्पाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेत आहेत.

नागपूरमधील इतर उड्डाणपुलांचीही चिंताजनक स्थिती

रामझुला पूल हा एकमेव मुद्दा नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या गृहनगर नागपूरमधील अनेक उड्डाणपुलांची स्थिती गंभीर झाली आहे:

बुटीबोरी आणि पार्डी उड्डाणपुलांमध्ये भेगा पडल्या आहेत

प्रजापती नगर पूल उद्घाटनाच्या दुसऱ्याच दिवशी कोसळला

मानकापूर पूलाचे काँक्रीट निखळल्याने एक स्पॅन तोडून पुन्हा बांधला जात आहे

या घटनांमुळे राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासनाच्या ‘दर्जेदार काम’ करण्याच्या दाव्यांवर गंभीर शंका उपस्थित होत आहेत. हमी कालावधीतच पुलांमध्ये तांत्रिक बिघाड समोर येणे, म्हणजे बांधकामाच्या गुणवत्तेत मोठी तडजोड झाल्याचे स्पष्ट संकेत आहेत, असे नागपूरकरांचे मत आहे.

@filephoto


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.