कुऱ्हा पोलिसांची कामगिरी: खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी २४ तासांत जेरबंद

0
58

तिवसा २८ : कुऱ्हा-सालोरा ते धोत्रा रस्त्यावर एका व्यक्तीचा चाकूने वार करून खून करणाऱ्या आरोपीला कुऱ्हा पोलिसांनी २४ तासांच्या आत अटक केली आहे.

ही घटना समोर आल्यानंतर पोलिसांनी तात्काळ हालचाल केली. धोत्रा येथील पोलीस पाटलांनी कुऱ्हा पोलीस स्टेशनला माहिती दिली की एका व्यक्तीला गंभीर जखमी अवस्थेत रस्त्यावर सोडून दिले आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली, मात्र जखमी व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. मृताची ओळख शिवा सोना राठोड (वय ५५, रा. सालोरा तसरे) अशी पटली.

या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी लगेच तपास सुरू केला. फॉरेन्सिक तज्ज्ञांना बोलावून घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला. प्रेमसिंग दशरथ चव्हाण (वय ४२, रा. सालोरा तसरे) यांच्या तक्रारीवरून कुऱ्हा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

अज्ञात आरोपीचा शोध घेण्यासाठी एक विशेष पथक तयार करण्यात आले. गोपनीय माहिती आणि साक्षीदारांच्या आधारे, पोलिसांनी श्रीकृष्ण भिकू राठोड (वय ४०, रा. सालोरा तसरे) याच्यावर संशय घेतला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक डॉ. अनुप वाकडे आणि त्यांच्या पथकाने केली. या पथकात पोलीस अंमलदार सोमेश्वर सपाटे, उमेश वाघमारे, अनिल निंगोट, दर्पण बनसोड, हेमंत डहाके, सागर निमकर यांचा समावेश होता. पुढील तपास सुरू आहे.