शहरात हातांनी घडवले हरित बाप्पा, मातीच्या गणेशमूर्ती कार्यशाळेत मान्यवरांचा सहभाग
या कार्यशाळेत सहभागी नागरिक, विद्यार्थ्यांनी मातीपासून स्वयंहस्ते गणेश मूर्ती तयार करण्याची कला आत्मसात केली. मूर्ती बनवताना मातीचा वापर करून प्लास्टर ऑफ पॅरिससारख्या पर्यावरणाला हानीकारक घटकांपासून दूर राहण्याचा संदेश या वेळी देण्यात आला. कार्यशाळेमध्ये प्रशिक्षकांनी उपस्थितांना मूर्ती तयार करण्याच्या विविध पद्धती आणि त्यामागील शाश्वततेचे महत्त्व समजावून सांगितले. कार्यशाळेसाठी लागणारे सर्व साहित्य अमरावती महापालिकेकडून उपलब्ध करून देण्यात आले होते. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व वयोगटांतील नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत पर्यावरण संरक्षणाचा संकल्प घेतला.
या उपक्रमाचा उद्देश म्हणजे पारंपरिक आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यास लोकांना प्रोत्साहित करणे तसेच ‘हरित आणि स्वच्छ अमरावती’चा संदेश व्यापक स्तरावर पोहोचवणे. आपल्या हातांनी घडवलेली ही मातीची बाप्पाची मूर्ती म्हणजे निसर्गाशी असलेली आपली नाळ जपण्याचा एक सुंदर प्रयत्न आहे, असे आयोजकांनी सांगितले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अमरावती महापालिका, सात्विक गणपतीचे संस्थापक मयुरी खताळे, माझी अमरावती फाउंडेशन संस्थापक सात्विक मुंडवायिक तसेच स्वयंसेवक व कार्यशाळेत सहभागी झालेल्या नागरिकांचे विशेष योगदान लाभले.
आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी पुढील सूचना दिल्या की, पीओपीपासून बनवलेल्या मूर्तींची स्थापना करणे टाळा, नैसर्गिक मातीच्या मूर्तीच निवडा. नैसर्गिक रंगांचा वापर करा, जे जलप्रदूषण टाळण्यास मदत करतात. घरगुती विसर्जनासाठी कृत्रिम टँक किंवा कुंड्या वापरा, जेणेकरून नदी, तलाव यांचे प्रदूषण रोखता येईल. मूळ परंपरा आणि पर्यावरण यांचा समतोल राखत गणेशोत्सव साजरा करा. त्यांनी शेवटी असेही म्हटले की, एक जबाबदार नागरिक म्हणून आपण जेव्हा पर्यावरणाचे भान ठेवतो, तेव्हा आपली संस्कृतीही अधिक समृद्ध होते. चला, या वर्षी आपल्या हातांनी हरित अमरावतीसाठी बाप्पा घडवू या. घरोघरी मातीच्या मूर्ती वापराव्या घरी घरी स्वतःच्या संकल्पनेतून मूर्ती तयार कराव्या असे आवाहन आयुक्तांनी केले आहे.
या वेळी अतिरिक्त आयुक्त महेश देशमुख, उपायुक्त नरेंद्र वानखडे, उपायुक्त योगेश पिठे, सहाय्यक आयुक्त नंदकिशोर तिखिले, भुषण पुसतकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. अजय जाधव, शिक्षणाधिकारी डॉ. प्रकाश मेश्राम, पशुशल्य चिकित्सक डॉ. सचिन बोंद्रे,भांडार अधिक्षक मंगेश जाधव, नगरसचिव संदिप वडुरकर, उद्यान निरिक्षक श्रीकांत गिरी, अधिकारी, कर्मचारी, माझी अमरावती फाउंडेशन व सात्विक गणपतीचे प्रतिनिधी व त्यांचे सहकारी उपस्थित होते.



