मराठा आरक्षणावरून सुषमा अंधारेंचा फडणवीसांना थेट सवाल

0
47

“जाणीवपूर्वक वातावरण चिघळण्यासाठी थांबले आहेत का?”

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील वातावरण तापले असताना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर तीव्र शब्दांत निशाणा साधला. “सगळेच मान्य करत आहेत की आरक्षण देण्याची कुवत फडणवीसांकडे आहे, मग ते नेमकी वाट कसली बघत आहेत? जाणीवपूर्वक वातावरण चिघळण्यासाठी ते थांबले आहेत का?” असा थेट सवाल उपस्थित करत त्यांनी फडणवीसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला.

सभागृहातील वातावरणाचा संदर्भ देत अंधारे म्हणाल्या की, “भाजपचे आमदार आणि नेते आई-बहिणींवरून शिवीगाळ करतात, अधिकाऱ्यांशी गलिच्छ भाषेत बोलतात, तेव्हा सभ्यता आठवत नाही. मात्र फडणवीसांवर टीका केली की भाजपकडून अपशब्दांचा वर्षाव होतो – ही दुहेरी भूमिका आम्ही लक्षात घेतली आहे.” पुढे बोलताना त्यांनी शिंदे–फडणवीस यांच्यातील शीतयुद्धाचा उल्लेख केला आणि “हे शीतयुद्ध मराठा व ओबीसी समाजात तणाव निर्माण करण्यासाठी वापरले जात आहे,” असा गंभीर आरोप केला.

मराठा आंदोलनाबाबतही त्यांनी फडणवीसांना प्रश्न विचारला. “आंदोलनासाठी लोक पायी, सायकलवर, मोटारसायकलवर, वडापमध्ये स्वाभिमानाने पदरमोड करून येत आहेत. तरीही ‘आंदोलनातून कोण फायदा घेते आहे, कोण नुकसान होते’ असे वक्तव्य देवेंद्रजींनी नेमके कोणाकडे बघून केले? हा इशारा एकनाथ शिंदेंना देण्याचा प्रयत्न आहे का?” असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या शीतयुद्धामुळे गावोगाव मराठा आणि ओबीसी समाजात असलेली सलोख्याची वीण तुटू नये; त्याचे पाप फडणवीसांनी करू नये.”