spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

डीजेच्या दणदणाटाला फाटा; वारकरी व भजनाच्या निनादात ‘मानाचा महागणपती’ला निरोप!

– भंडारा येथील नव बजरंग गणेशोत्सव मंडळाचा स्तुत्य निर्णय; २८ सप्टेंबरला निघणार विसर्जन मिरवणूक

हंसराज,भंडारा :- लोकसंस्कृती, प्रदीर्घ परंपरा आणि अथांग श्रद्धेचे प्रतीक असलेल्या भंडारा शहरातील मानाचा महागणपती—नव बजरंग गणेशोत्सव मंडळाच्या गणरायाला यंदा अत्यंत पारंपरिक आणि भक्तिमय वातावरणात येत्या २८ सप्टेंबर रोजी निरोप दिला जाणार आहे. सध्या विसर्जन मिरवणुकांमध्ये वाढलेल्या कर्णकर्कश डीजेच्या संस्कृतीला छेद देत मंडळाने यंदा वारकरी संप्रदाय, भजन, पारंपरिक वाद्ये आणि शिस्तबद्ध ढोल-टपरी पथकांना प्राधान्य देण्याचा कौतुकास्पद निर्णय घेतला आहे.

गेल्या काही वर्षांपासून विसर्जन मिरवणुकांमध्ये वाढणाऱ्या कानठळ्या बसवणाऱ्या डीजेच्या आवाजामुळे ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, रुग्ण आणि पर्यावरणप्रेमींकडून तीव्र चिंता व्यक्त केली जात आहे. सामाजिक भान जपत आणि महाराष्ट्राच्या समृद्ध लोकपरंपरेचा वारसा पुढे नेत नव बजरंग मंडळाने “डीजेपेक्षा भक्ती आणि दणदणाटापेक्षा संस्कृती” हा सकारात्मक संदेश संपूर्ण समाजाला दिला आहे.

यंदाच्या विसर्जन मिरवणुकीचे मुख्य आकर्षण म्हणजे टाळ-मृदंगाच्या गजरात चालणारी वारकरी दिंडी, विविध भजन मंडळींचे सादरीकरण आणि पारंपरिक ढोल-टपरीचा गजर असणार आहे.

यामुळे केवळ उत्साहच नव्हे, तर विसर्जन सोहळ्यात एक नितांत भक्तिमय आणि शिस्तबद्ध वातावरण निर्माण होणार आहे.

बजरंग चौक येथील नव बजरंग गणेशोत्सव मंडळ यंदा आपल्या स्थापनेच्या १०५ व्या वर्षात पदार्पण करत आहे. शतकोत्तर वाटचालीत मंडळाने केवळ धार्मिक उत्सव न साजरे करता सामाजिक, सांस्कृतिक आणि सेवाभावी उपक्रमांची परंपरा अविरतपणे जपली आहे.

पर्यावरणपूरक व संस्कृतीचे जतन करणारा मंडळाचा हा निर्णय इतर सर्व गणेश मंडळांसाठीही निश्चितच मार्गदर्शक आणि अनुकरणीय ठरणार आहे.

“गणेशोत्सव हा आपल्या संस्कृतीचा आणि आनंदाचा सण आहे. उत्सवाचा आनंद घेताना कोणालाही त्रास होणार नाही आणि आपली मूळ परंपरा जपली जाईल,   या उद्देशानेच आम्ही डीजे पूर्णपणे टाळून वारकरी दिंडी व पारंपरिक वाद्यांना प्राधान्य दिले आहे. २८ सप्टेंबर रोजी होणाऱ्या विसर्जन सोहळ्यात भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे.”

  — जॅकी रावलानी (अध्यक्ष)                         

 — अजय ब्राम्हणकर (कार्याध्यक्ष)  नव बजरंग गणेशोत्सव मंडळ, भंडारा                 


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.