नरखेड, प्रतिनिधी :- करणागड ग्रीन व्हॅली फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड, नरखेड (नाबार्ड अर्थसहाय्य) यांच्या वतीने केंद्र सरकारच्या १० हजार एफपीओ सेंट्रल सेक्टर स्कीमअंतर्गत वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले. सभेला कंपनीचे भागधारक, संचालक, कृषी विभागाचे अधिकारी तसेच एफपीओ व सीबीबीओ सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळ (SPMESM), छत्रपती संभाजीनगरचे प्रतिनिधी उपस्थित होते.
कार्यक्रमाला एमजीआयआरआय, वर्धा येथील डॉ. प्रशांत तायडे, सीबीबीओचे प्रकल्प संचालक आदित्य देशपांडे, विवेक बोरकर, अंकित बनसोड तसेच नरखेडचे कृषी अधिकारी पंकज कोकाटे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कंपनीचे अध्यक्ष प्रशांत खुरसंगे होते.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सरस्वती पूजनाने झाली. यावेळी उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नीतिराज झाडे यांनी केले.
कंपनीच्या प्रगतीचा घेतला आढावा
अध्यक्षीय भाषणात प्रशांत खुरसंगे यांनी करणागड ग्रीन व्हॅली फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या आतापर्यंतच्या कामकाजाचा व प्रगतीचा आढावा सादर केला. शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून कृषी मालाचे उत्पादन, संकलन, प्रक्रिया, मूल्यवर्धन आणि थेट बाजारपेठेशी जोडणी यावर अधिक भर देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
कंपनीच्या माध्यमातून भागधारक शेतकऱ्यांना विविध कृषीविषयक सेवा उपलब्ध करून देणे, कंपनीच्या कामकाजात शेतकऱ्यांचा सहभाग वाढविणे तसेच भविष्यात कंपनीला अधिक सक्षम करण्यासाठी सर्व संचालक व भागधारकांनी एकजुटीने काम करणे आवश्यक असल्याचेही खुरसंगे यांनी नमूद केले.
संचालक, भागधारकांची उत्स्फूर्त उपस्थिती
सभेला कंपनीचे संचालक यशवंत राऊत, विलास सातपुते, शंकर बारसकर, संचालिका सुनंदाताई वैद्य यांच्यासह इतर संचालक व मोठ्या संख्येने भागधारक शेतकरी उपस्थित होते.
सभेदरम्यान कंपनीच्या आतापर्यंतच्या कामकाजाचा व विविध उपक्रमांचा आढावा घेण्यात आला. आगामी काळात राबविण्यात येणारे विविध उपक्रम, शेतकऱ्यांच्या हितासाठी राबविण्यात येणाऱ्या योजना तसेच कंपनीच्या भविष्यातील कार्ययोजनेवर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी भागधारक शेतकऱ्यांनी कंपनीच्या आगामी कार्यपद्धतीबाबत विविध सूचना व विचार मांडले.
शेतकऱ्यांच्या सामूहिक विकासाचा संकल्प
कार्यक्रमाच्या शेवटी सुनंदा वैद्य यांनी उपस्थित मान्यवर, संचालक, भागधारक आणि सर्व सहकाऱ्यांचे आभार मानले. शेतकऱ्यांच्या सामूहिक विकासाला गती देणे, त्यांच्या कृषी मालाला योग्य बाजारपेठ उपलब्ध करून देणे आणि करणागड ग्रीन व्हॅली फार्मर प्रोड्युसर कंपनीला भविष्यात अधिक सक्षम व प्रभावी बनविण्याचा संकल्प व्यक्त करत वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली.





