नागपूर १२ : गणेशपेठ आणि मानकापूर परिसरात चोरीच्या दोन वेगवेगळ्या घटना समोर आल्या आहेत. गणेशपेठमध्ये एका घरकाम करणाऱ्या नोकराने २१ लाखांपेक्षा जास्त किमतीचे दागिने आणि रोकड लंपास केली, तर मानकापूरमध्येही ५५ हजार रुपयांची चोरी झाल्याची नोंद झाली आहे.
गणेशपेठ येथील गीतांजली चौकात राहणाऱ्या ५३ वर्षीय ऋतू अजितकुमार सारडा यांच्या घरातून ही चोरी झाली आहे. ऋतू यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचा घरकाम करणारा नोकर राज चक्रवर्ती (३५, रा. पश्चिम बंगाल) हा गेल्या तीन महिन्यांपासून त्यांच्याकडे कामाला होता. काही दिवसांपूर्वी ऋतू दिल्लीला जाण्याच्या तयारीत असताना त्यांनी बँक लॉकरमधील जवळपास २१ लाख ५ हजार रुपयांचे सोने-चांदीचे दागिने आणि रोकड बेडरूममधील कपाटात ठेवले होते.
जेव्हा ऋतू यांच्या पतीने कपाटातून पैसे काढण्यासाठी कपाट उघडले, तेव्हा त्यांना दागिने आणि रोकड गायब असल्याचे आढळले. चोरी झालेल्या वस्तूंमध्ये सोन्याचा कमरपट्टा, शिरपट्टा, ४ सोन्याच्या बांगड्या, हिऱ्याची अंगठी, कानातले झुमके आणि १ लाख ७० हजार रुपयांची रोकड यांचा समावेश आहे. या घटनेनंतर नोकर राज चक्रवर्ती बेपत्ता असून, त्याचा मोबाईलही बंद आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, त्याचा शोध सुरू आहे.
@filephoto




