– गणितातील क्षेत्र प्रकल्पाबाबत विद्यापीठात कार्यशाळा
नागपूर :- अनुभवी शिक्षक विद्यार्थ्यांच्या दृष्टीने ज्ञान संपदा असल्याचे प्रतिपादन विद्यापीठ शिक्षण मंचाच्या अध्यक्षा डॉ. कल्पना पांडे यांनी केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा पदव्युत्तर गणित विभाग आणि गणित अभ्यास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीनिवास रामानुजन सभागृहात ‘गणित विषयातील क्षेत्र प्रकल्पांची ओळख’ या विषयावर गुरुवार, दि. ९ ऑक्टोंबर २०२५ रोजी कार्यशाळा पार पडली. या कार्यशाळेत डॉ. पांडे मार्गदर्शन करीत होत्या.
कार्यक्रम कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून विद्यापीठ शिक्षण मंचच्या अध्यक्षा डॉ. कल्पना पांडे, वक्ते तथा अभ्यास मंडळ सदस्य डॉ. सुभाष ताडे, अभ्यास मंडळ अध्यक्ष डॉ. कल्पना पवार, विद्यापीठ गणित विभाग प्रमुख डॉ. गणेश केदार, एसएफएस महाविद्यालयातील गणित विभाग प्रमुख डॉ. सुजाता जनार्दन यांची उपस्थिती होती. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP 2020) लागू होऊन दोन वर्षांचा कालावधी झाला आहे. महाराष्ट्रातील इतर विद्यापीठाच्या तुलनेत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने जपान, अमेरिका, युरोप यासह आंतरराष्ट्रीय स्तरावरील उच्च शिक्षणाच्या दर्जाप्रमाणे मेजर, मायनर विषय निश्चित करीत अभ्यासक्रम तयार केला असल्याची माहिती डॉ. पांडे यांनी पुढे बोलताना दिली.

जपानच्या एका शिक्षकाने नुकत्याच नागपूर भेटीत याबाबत जपान प्रमाणे विद्यापीठाचा अभ्यासक्रम असल्याचे सांगितले. काही वर्षांपूर्वी जपान देखील उच्च शिक्षणाच्या बाबतीत भारताप्रमाणेच होता. मात्र, संकटातून निघालेल्या जपानने शैक्षणिक बदलातून प्रगती केल्याची माहिती तेथील शिक्षकाने दिल्याचे डॉ. पांडे यांनी सांगितले. आपण प्रारंभिक स्तरावर असल्याने उच्च दर्जाचा अभ्यासक्रम निर्माण करण्याची जबाबदारी आपलीच आहे. यामध्ये गणित विषयात क्षेत्र प्रकल्प कशा प्रकारे असावे, याबाबत शिक्षक म्हणून सर्व समावेशक असा अभ्यासक्रम निश्चित करावा लागेल. आपणातील प्रत्येकजण हा धोरणाचा भाग असून विद्यार्थ्यांमधील ज्ञान वृद्धीच्या दृष्टीने आपणास निर्णय घ्यावयाचा असल्याचे डॉ. पांडे म्हणाल्या. आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) मध्ये भावना नसल्याने संभाव्यता काढण्याची क्षमता नाही. ही क्षमता केवळ शिक्षकांमध्येच असून भविष्याचा विचार करून अभ्यासक्रम तयार केला पाहिजे, असे आवाहन डॉ. पांडे यांनी यावेळी केले. भारतीय ज्ञान परंपरेतील वैदिक गणित विषय अनेक अभ्यासक्रमातील विषयांमध्ये समाविष्ट करण्यात आला. या विषयाला आजच्या काळाला अनुसरून परिवर्तन केल्यास अभ्यास मंडळासमोर याबाबत चर्चा करता येईल. देशातील आयआयटी, आयआयएम, एनआयटी आदी उच्च शिक्षण संस्थांमधील शिक्षक वर्तमानाला अनुसरून आपल्या अभ्यासक्रमामध्ये सातत्याने बदल करीत असतात.यामुळेच या संस्थांचे नाव मोठे होत जाते. याप्रमाणे विद्यापीठातील शिक्षकांना देखील आजच्या विद्यार्थ्यांना अपेक्षित असलेला अभ्यासक्रम तयार करणे गरजेचे आहे. अनेक विषयांसोबत गणित जुडलेला आहे. भविष्यात गणिताला अधिक महत्त्व असून या सोबतच अन्य विषयांचा अभ्यास करून योग्य अभ्यासक्रम तयार करण्याचे आवाहन डॉ. पांडे यांनी केले.
गणित क्षेत्र प्रकल्पाबाबत सादरीकरण
या कार्यशाळेत गणित अभ्यासक्रमातील क्षेत्र प्रकल्पांबाबत अभ्यास मंडळ सदस्य डॉ. सुभाष ताडे, प्राचार्य डॉ. पराग निमजे, डॉ. कल्पना पवार यांनी सादरीकरण केले. गणित क्षेत्र प्रकल्प याबाबत अभ्यासक्रम कसा असावा. याला किती गुण देण्यात यावे. किती गुणांचा कोणता भाग असावा याबाबत सविस्तर चर्चा या कार्यशाळेच्या माध्यमातून करण्यात आली. डॉ. गणेश केदार यांनी संशोधन प्रकल्प कशाप्रकारे तयार करावे याबाबत माहिती दिली. कार्यक्रमाचे संचालन सुधा राणी यांनी केले तर आभार डॉ. कल्पना पवार यांनी मानले. कार्यशाळेला विद्यापीठ अभ्यास मंडळाचे सदस्य संचालित महाविद्यालयातील गणित शिक्षकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.




