नागपूर १२ : आम आदमी पार्टीने (आप) उत्तर नागपूर विधानसभा क्षेत्रातील प्रभाग क्रमांक ६, वैशाली नगर चौक येथे आपले नवे जनसंपर्क कार्यालय सुरू केले आहे. पक्षाच्या संघटना वाढीसाठी आणि नागरिकांशी थेट संपर्क साधण्यासाठी हे कार्यालय महत्त्वपूर्ण ठरेल, अशी अपेक्षा आहे.
या कार्यालयाचे उद्घाटन ‘आप’च्या अनुसूचित जाती आघाडीचे शहराध्यक्ष प्रशांत मेश्राम यांच्या मातोश्री, सीता अंबादास मेश्राम यांच्या हस्ते रिबिन कापून करण्यात आले. यावेळी ‘आप’चे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पक्षाची वाढती विश्वासार्हता
‘आप’चे नेते म्हणाले की, पक्ष संविधानातील मूलभूत अधिकारांचे संरक्षण करण्यासाठी कटिबद्ध आहे. तसेच, आगामी नागपूर महानगरपालिका निवडणुकीत शिक्षण, आरोग्य, वीज, पाणी आणि स्वच्छता यांसारख्या मूलभूत सुविधांवर लक्ष केंद्रित केले जाईल. यामुळे नागरिकांचा पक्षावरील विश्वास वाढत असल्याचे दिसून येत आहे. या कार्यक्रमात सर्व नेत्यांनी एकत्र येऊन संघटनेची ताकद वाढवण्याचे आणि पक्षाची भूमिका अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले.
या कार्यक्रमात महाराष्ट्र राज्याचे संघटन मंत्री भूषण ढाकूळकर, सचिव डॉ. शाहिद अली जाफरी, सुनील दादा वाडसकर, जिल्हाध्यक्ष ऋषभ वानखेडे, शहर महासचिव डॉ. अमेय नारनवरे, शहर संघटन मंत्री रोशन डोंगरे, प्रदीप पौनीकर, जिल्हा उपाध्यक्ष शैलेश गजभिये, सह संघटन मंत्री गिरीश तितरमारे, युवा संघटन मंत्री सुमित शेंडे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
या प्रसंगी अनेक नवीन सदस्यांनी पक्षात प्रवेश केला. कार्यालयाच्या माध्यमातून जनतेच्या मूलभूत सुविधांसाठी पूर्ण ताकदीने संघर्ष करण्याची ग्वाही प्रशांत मेश्राम यांनी दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नीलम ताई नारनवरे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. अमेय नारनवरे, रोशन डोंगरे, नीलम नारनवरे, प्रशांत मेश्राम, धम्मपाल जांभुळकर, अजय जांभुळकर, अंशुल गणविर, कैलाश तभाणे, सुशील देशभ्रतार यांनी विशेष परिश्रम घेतले.








