– स्थानिक गुन्हे शाखेची शहापूर येथे कारवाई, जवाहरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल*
हंसराज,भंडारा :- जवाहरनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शहापूर (ता. जि. भंडारा) येथे अवैधरित्या मोहाफास साठवून ठेवल्याप्रकरणी एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केलेल्या कारवाईत सुमारे 80 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. राहुल मार्कड गोस्वामी (वय 33, रा. शहापूर, ता. जि. भंडारा) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस शिपाई शहारे यांना गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार पथकाने छापा टाकला असता, शहापूर येथील सुरनदीच्या काठालगत आरोपी मिळून आला. त्याच्या ताब्यात 10 प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये भरलेला सडवा मोहाफास आढळला. प्रत्येक पिशवीत सुमारे 40 किलो याप्रमाणे एकूण 400 किलो मोहाफास होता. प्रति किलो 200 रुपये दराने त्याची एकूण किंमत 80 हजार रुपये असल्याचे पोलीसांनी सांगितले.
या प्रकरणी पोलीस शिपाई शहारे यांच्या फिर्यादीवरून जवाहरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 464/2026 नुसार महाराष्ट्र दारूबंदी कायद्यातील कलम 65 (फ) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नूरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे आणि पोलीस निरीक्षक गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार तुमाने, पोलीस शिपाई शहारे व पोलीस शिपाई ढबाले यांनी कारवाईत सहभाग घेतला. या गुन्ह्याचा पुढील तपास जवाहरनगर पोलीस ठाण्याचे अधिकारी करीत आहेत.








