– सरदार पटेल जयंतीनिमित्त पोलीस दल व वाघाये महाविद्यालयाचा संयुक्त उपक्रम
हंसराज, लाखनी :- सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिनाचे औचित्य साधून भंडारा जिल्हा पोलीस दल, पोलीस स्टेशन लाखनी आणि स्व. निर्धन पाटील वाघाये कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, लाखनी यांच्या संयुक्त विद्यमाने मॅरेथॉन रन व वॉकिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर झालेल्या या स्पर्धेला विद्यार्थी, पोलीस कर्मचारी, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
स्पर्धेचे उद्घाटन पोलीस निरीक्षक आशिष गजभिये व सहाय्यक पोलीस निरीक्षक अचल कपूर यांच्या हस्ते करण्यात आले. स्पर्धकांना शुभेच्छा देताना अचल कपूर यांनी मॅरेथॉन स्पर्धेचे महत्त्व सांगितले. ‘वॉक फॉर युनिटी’ ही केवळ शारीरिक व्यायामाची किंवा चालण्याची स्पर्धा नसून ती मनातील एकतेचा संकल्प आहे, असे त्यांनी सांगितले. जात, धर्म आणि भाषा यांचे भेद विसरून सर्वजण एकत्र चालतात, तेव्हा ‘विविधतेत एकता’ हेच भारताचे खरे सामर्थ्य असल्याचा संदेश जगाला मिळतो, असेही ते म्हणाले.
यावेळी पोलीस उपनिरीक्षक अतुल तराळे यांनीही स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या. महाविद्यालयाचे कार्यकारी प्राचार्य डॉ. गणेश कापसे यांनी मनोगतात, देशाची एकता आणि अखंडता हाच आपल्या अस्तित्वाचा पाया असल्याचे सांगितले. अशा स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साह निर्माण होतो, तसेच त्यांचा शारीरिक व मानसिक विकास होतो, असेही त्यांनी नमूद केले. पोलीस विभागाने महाविद्यालयाला या उपक्रमात सहभागी करून घेतल्याबद्दल त्यांनी सर्व पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे आभार मानले. भविष्यात लाखनी तालुक्यातील स्पर्धकांना प्रोत्साहन देणारी मोठी क्रीडा स्पर्धा आयोजित करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. प्रा. कैवल्यदास सूर्यवंशी यांनीही स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या.
स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे :
महिला मॅरेथॉन : प्रथम – पायल गुरुदेव दिघोरी, द्वितीय – शुभांगी शरद पचारे, तृतीय – वैष्णवी पुष्कर देशमुख.
पुरुष मॅरेथॉन : प्रथम – अभिषेक राधेश्याम गीतमारे, द्वितीय – अनिकेत हेमराज फंदे, तृतीय – प्रणय प्रशांत कावले.
ज्युनिअर गट : प्रथम – भविष्य सूर्यभान मांढरे, द्वितीय – डेविड तिलक वंजारी, तृतीय – कार्तिक लक्ष्मण उईके.
अवघ्या ११ वर्षांच्या हिमांशी मनोजकुमार राणे हिनेही स्पर्धेत सहभाग नोंदविला. तिच्या सहभागाबद्दल मान्यवरांच्या हस्ते तिचा सत्कार करण्यात आला. सर्व विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते पदक व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांकरिता विशेष वॉकिंग स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये ॲड. शफी लद्यानी, भीमराव गभणे, डॉ. अंबादे, शिवलाल निखारे यांच्यासह अनेक ज्येष्ठ नागरिकांनी सहभाग घेतला. याशिवाय पोलीस विभागातील अधिकारी व कर्मचारी, महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनीही ‘वॉक फॉर युनिटी’मध्ये सहभागी होऊन राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश दिला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण व क्रीडा निर्देशक डॉ. सुधीर सहारे यांनी केले, तर आभार प्रदर्शन राष्ट्रीय सेवा योजना विभागप्रमुख डॉ. पुण्यशील टेंभुर्णे यांनी केले.








