spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

चाचेर येथे आज कोजागिरी महोत्सवाचा उत्साह; रक्तदान, मोफत नेत्रतपासणी व ‘संतान’ नाटकाची मेजवानी

किशोर साहू,मौदा :- परमात्मा एक सेवक मंडळ शाखा चाचेर यांच्या वतीने महानत्यागी बाबा जुमदेवजी यांच्या आदेशानुसार आणि मार्गदर्शक धर्मराज बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली कोजागिरी महोत्सवाचे आयोजन रविवार (ता. १ नोव्हेंबर) रोजी करण्यात आले आहे. या महोत्सवानिमित्त धार्मिक, सामाजिक, आरोग्यविषयक तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे.

महोत्सवाच्या पूर्वतयारीचा एक भाग म्हणून आज शनिवार (तारीख ३१ ऑक्टोबर) रोजी रात्री ग्रामस्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अभियानात सेवक-सेविकांनी सहभागी होऊन स्वच्छतेचा संदेश देण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

रविवारी सकाळी ९ ते १० या वेळेत हवन कार्य, त्यानंतर सकाळी १० ते १०.३० वाजेपर्यंत भगवंत व महानत्यागी बाबा जुमदेवजी यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात येईल. सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत भगवत कार्याच्या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले असून त्यानंतर तीर्थप्रसाद व सामूहिक भोजनाचा कार्यक्रम होणार आहे.

रक्तदान व मोफत नेत्रतपासणी शिबिराचे आयोजन

सामाजिक बांधिलकी जपत सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचबरोबर अत्याधुनिक मशीनद्वारे नागरिकांची मोफत नेत्रतपासणी करण्यात येणार आहे. नागरिकांनी या आरोग्यविषयक उपक्रमाचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

‘संतान’ नाटक ठरणार महोत्सवाचे विशेष आकर्षण

महोत्सवाची सांगता सांस्कृतिक कार्यक्रमाने होणार असून, रात्री ८ ते ११ या वेळेत युवा रंगमंच, वडसा प्रस्तुत युवराज प्रधान निर्मित तीन अंकी ‘संतान’ या नाटकाचे सादरीकरण करण्यात येणार आहे. या नाट्यप्रयोगाचा लाभ घेण्यासाठी परिसरातील रसिक प्रेक्षकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

सदर सर्व कार्यक्रम प.पू. परमात्मा एक सेवक मंडळ, मानव मंदिर शाखा – चाचेर येथे पार पडणार आहेत. महोत्सवात समस्त सेवक-सेविका, बालसेवक, युवा सेवक तसेच परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजक परमात्मा एक सेवक मंडळ शाखा – चाचेर यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Popular Articles