– उत्कृष्ट कार्य, तपासातील गुणवत्ता, साहसी गुप्तचर सेवा आणि फॉरेन्सिक विज्ञानातील योगदानाची दखल
नवी दिल्ली :- देशातील पोलीस दल, सुरक्षा यंत्रणा आणि तपास यंत्रणांमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या उत्कृष्ट कार्याची दखल घेण्यासाठी देण्यात येणाऱ्या ‘केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदका’साठी वर्ष २०२६ मध्ये विविध राज्ये, केंद्रशासित प्रदेश, केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आणि केंद्रीय पोलीस संघटनांमधील एकूण ४९० अधिकारी व कर्मचाऱ्यांची निवड करण्यात आली आहे.यामध्ये महाराष्ट्रातील १९ अधिकारी व कर्मचारी यांचा समावेश आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आणि केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आलेल्या या पदकाद्वारे पोलीस व सुरक्षा यंत्रणांमधील उल्लेखनीय योगदानाचा गौरव केला जातो.
उत्कृष्ट कार्याची दखल घेणे, उच्च व्यावसायिक कार्यमानके प्रोत्साहित करणे तसेच अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढविणे हा या पदकाचा प्रमुख उद्देश आहे. दरवर्षी ३१ ऑक्टोबर रोजी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीदिनी या पदकांची घोषणा करण्यात येते.
पोलीस दल, सुरक्षा संघटना, राज्ये व केंद्रशासित प्रदेशांच्या गुप्तचर आणि विशेष शाखा, केंद्रीय पोलीस संघटना,केंद्रीय सशस्त्र पोलीस दल, राष्ट्रीय सुरक्षा गारद,आणि आसाम रायफल्समधील अधिकारी व कर्मचाऱ्यांना विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय कामगिरीसाठी हे पदक प्रदान केले जाते.यामध्ये विशेष मोहिमांमधील उत्कृष्ट कामगिरी, गुन्हे तपासातील गुणवत्तापूर्ण सेवा, असाधारण कार्यक्षमता, धाडसी व उल्लेखनीय गुप्तचर सेवा तसेच फॉरेन्सिक विज्ञान क्षेत्रातील योगदानाचा समावेश आहे. फॉरेन्सिक विज्ञान क्षेत्रात कार्यरत शासकीय वैज्ञानिकांचाही त्यांच्या उल्लेखनीय कार्यासाठी या पदकाद्वारे गौरव करण्यात येतो.
महाराष्ट्रातील पदक प्राप्त अधिकाऱ्यांची नावे पुढील प्रमाणे विशेष कृती दल
१. लक्ष्मी गौतम – सह पोलीस आयुक्त
२. विशाल हिरालाल ठाकूर – पोलीस उपायुक्त
३. आत्माजी शिवाजी सावंत – पोलीस निरीक्षक
४. अमोल माधव माळी – सहाय्यक पोलीस निरीक्षक
५. रामदास तात्याबा कदम – सहाय्यक पोलीस निरीक्षक
६. स्वप्नील रामदास काळे – पोलीस उपनिरीक्षक
७. शिवप्रसाद बाळासाहेब पठारे – पोलीस अंमलदार
तपास विभाग
१. कुमार चिंथा – सहाय्यक पोलीस अधीक्षक
२. ऋषिकेश रेड्डी – पोलीस अधीक्षक
३. रामेश्वर रेंगे – सहाय्यक पोलीस आयुक्त
४. माणिक बेदरे – पोलीस निरीक्षक
५. डॉ. एम. सी. व्ही. महेश्वर रेड्डी – अपर पोलीस अधीक्षक
६. प्रभावती एकुर्के – पोलीस निरीक्षक
७. रितेश आहेर – पोलीस निरीक्षक
८. ईश्वर काटकर – अपर पोलीस अधीक्षक
९. रामचंद्र मोहिते – पोलीस निरीक्षक
१०. अश्विनी अभिजीत पाटील – पोलीस निरीक्षक
११. पूजा गायकवाड – उप पोलीस अधीक्षक –
न्यायवैद्यक शास्त्र विभाग
१. डॉ. विजय जयवंतराव ठाकरे – संचालक







