– सपन नदी प्रकल्पातील पाण्याचा वापर करून वीजनिर्मितीची योजना
अमरावती :- अमरावतीच्या अचलपूर तालुक्यातील सपन नदी प्रकल्पातील पाण्याचा वापर करून मेळघाटातील चिखलदरा तालुक्यातील अडनदी येथे उदंचन जलविद्युत प्रकल्प उभारण्याचे प्रस्तावित आहे. अदानी हायड्रो एनर्जी टेन लिमिटेड कंपनीकडून हा प्रकल्प विकसित केला जाणार असून, यासाठी राज्य शासनाच्या जलसंपदा विभागासोबत सामंजस्य करार करण्यात आला आहे. १५०० मेगावॅट क्षमतेच्या या प्रकल्पासाठी ८२५० कोटी रुपयांची गुंतवणूक प्रस्तावित असून, त्यातून सुमारे ४८०० जणांना रोजगार उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे.
दोन जलाशय उभारण्याचे नियोजन
या प्रकल्पासाठी दोन जलाशय उभारण्याचे नियोजन आहे. त्यापैकी वरचा जलाशय चिखलदरा तालुक्यातील कामापूर येथे, तर खालचा जलाशय अडनदी गावात प्रस्तावित आहे. प्रकल्पात ३०० मेगावॅट क्षमतेचे चार आणि १५० मेगावॅट क्षमतेचे दोन, असे एकूण सहा रिव्हर्सिबल पंप टर्बाइन बसविण्याचे नियोजन आहे. या प्रकल्पातून कमाल सहा तास वीज निर्मिती करता येणार आहे.
दरवर्षी १.४० दलघमी पाण्याची गरज
विद्युत निर्मितीसाठी कमाल कालावधी सहा तास एवढा आहे. या जलविद्युत प्रकल्पासाठी एकदा जलाशय भरण्याकरिता १७.५१ दलघमी पाण्याची आवश्यकता असून हे पाणी अचलपूर तालुक्यातील सपन प्रकल्पातून घेतले जाणार आहे. सोबतच बाष्पीभवन व इतर कारणांमुळे कमी होणारा पाणीसाठा तूट भरून काढण्यासाठी दरवर्षी १.४० दलघमी पाणी लागणार आहे. हा जलविद्युत प्रकल्प सपन मध्यम प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात येत आहे.
प्रादेशिक वनविभागाने दिली परवानगी
प्रादेशिक वनविभागाकडून या जलविद्युत प्रकल्पाकरिता परवानगी घेण्यात आली असून भूगर्भीय तपासण्या केल्या जात आहेत. याकरिता आधुनिक यंत्रांच्या साहाय्याने तांत्रिक कर्मचारी राबत आहेत. यादरम्यान व्याघ्र प्रकल्प अभयारण्य व पर्यावरण विभागाच्या भूमिकेवर सर्वांचे लक्ष लागले आहे.
सपन प्रकल्पातून घेतले जाणार पाणी
अदानी जलविद्युत प्रकल्पाकरिता आवश्यक पाण्याची सपन प्रकल्पातून एकदाच उचल केली जाणार आहे. वरचे जलाशय भरून घेण्याकरिता ही पाण्याची उचल केली जाणार आहे. १७ किलोमीटर लांबीच्या बंद पाईप लाईनद्वारे ही पाण्याची उचल होणार आहे.
– श्रीकांत उमप, कार्यकारी अभियंता, मध्यम व लघुपाटबंधारे विभाग






