spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

दिवाळीच्या फटाक्यांनी ७५ हून अधिक जणांच्या डोळ्यांना इजा

– दोघांची दृष्टी कायमची बाधित

भंडारा :- यंदाच्या दिवाळीत फटाके फोडण्याच्या उत्साहात सुरक्षेकडे दुर्लक्ष केल्याने अनेकांना डोळ्यांच्या गंभीर दुखापतींना सामोरे जावे लागले आहे. भंडारा शहरात आतापर्यंत ७५ ते ८० नागरिकांनी डोळ्यांना झालेल्या दुखापतींसाठी खासगी नेत्रदवाखान्यांमध्ये उपचार घेतल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये दोघांची दृष्टी गेली असून, अनेकांच्या बुबुळांना गंभीर इजा झाली आहे. त्यामुळे फटाक्यांच्या आतषबाजीचा आनंद काही नागरिकांसाठी वेदनादायी ठरला आहे.

अनेकांच्या बुबुळांना गंभीर दुखापत

शहरातील पाच प्रमुख नेत्रदवाखान्यांमध्ये दिवाळीच्या काळात जखमी रुग्णांची गर्दी दिसून आली. डॉ. जीभकाटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, अवघ्या दोन दिवसांत त्यांच्या दवाखान्यात १५ ते २० रुग्ण डोळ्यांना दुखापत झाल्याने उपचारासाठी आले. त्यापैकी दोघांची दृष्टी गेली, तर अनेक रुग्णांच्या बुबुळांना गंभीर इजा झाली आहे. याशिवाय डोळ्यांना किरकोळ दुखापत झालेल्या रुग्णांची संख्याही मोठी आहे.

फॅन्सी फटाक्यांमुळे धोका वाढला

यंदा फॅन्सी आणि हवेत उडणाऱ्या फटाक्यांचा वापर वाढल्याने दुखापतींच्या घटनांमध्ये भर पडल्याचे सांगण्यात येत आहे. अनेक ठिकाणी फटाके हातातच फुटल्याने नागरिकांचे हात भाजले, तसेच डोळ्यांनाही गंभीर इजा झाली. गोंडउमरी गावात सुतळी बॉम्ब पायाने दूर सारण्याचा प्रयत्न करत असताना तो फुटल्याने एका व्यक्तीचा अंगठा क्षतिग्रस्त झाल्याची घटनाही घडली.

फटाके फोडताना काळजी घेण्याचे आवाहन

फटाके फोडताना आवश्यक ती खबरदारी न घेतल्यास डोळ्यांना कायमस्वरूपी इजा होण्याचा धोका असतो. त्यामुळे लहान मुलांनी आणि नागरिकांनी फटाके हातात धरून फोडू नयेत, फटाके पेटवल्यानंतर सुरक्षित अंतर ठेवावे आणि डोळ्यांच्या संरक्षणासाठी योग्य काळजी घ्यावी, असे आवाहन नेत्रतज्ज्ञांनी केले आहे. फटाक्यांमुळे डोळ्यांना दुखापत झाल्यास डोळे चोळू नयेत किंवा स्वतःहून उपचार करण्याचा प्रयत्न करू नये. तातडीने नेत्रतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Popular Articles