– तिघांचा बळी घेणारी वाघीण जेरबंद
गडचिरोली :- भामरागड वनविभागांतर्गत येणाऱ्या कसनसूर (प्रादेशिक) वनपरिक्षेत्रात धुमाकूळ घालून तीन ग्रामस्थांचा बळी घेणाऱ्या तीन वर्षीय वाघिणीला जेरबंद करण्यात वनविभाग आणि ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या जलद बचाव पथकाला (आरआरटी) यश आले आहे. शुक्रवारी (दि. १३ नोव्हेंबर) पहाटे ३ वाजून २ मिनिटांच्या सुमारास अत्यंत थरारक मोहिमेत या वाघिणीला यशस्वीरित्या बेशुद्ध करण्यात आले.
कसनसूर वनपरिक्षेत्रातील जारावंडी राऊंडमधील वडसाकला बीट (कक्ष क्रमांक १) येथे ही धडक मोहीम राबवण्यात आली. ‘जी-२५ एसएएफ’ अशी ओळख असलेल्या या सुमारे तीन वर्षीय वाघिणीला पहाटेच्या सुमारास अचूक नेम साधत बेशुद्ध करण्यात आले. त्यानंतर तातडीने पुढील तपासणी व कार्यवाहीसाठी सुरक्षितरित्या कसनसूर येथील वनपरिक्षेत्र कार्यालयात हलवण्यात आले. वाघिणीला बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यानात (नागपूर) सोडले जाणार आहे.
वाघिणीने यांचा घेतला बळी
जी- २५ वाघिणीने मागील चार महिन्यांत एटापल्ली तालुक्यात तीन बळी घेतले. १६ ऑगस्ट रोजी दोलंदा येथील हरी बोहरण वड्डे (५७), १९ ऑक्टोबर रोजी इरपनपायली येथील विलाशी आनंद बा (७०) तर २ नोव्हेंबर रोजी दिंडवी येथील सदाशिव झिटू दुग्गा (६०) यांच्यावर हल्ला करून ठार केले होते.
१२२ वी यशस्वी मोहीम; या पथकाने केली कामगिरी
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प (टीएटीआर), चंद्रपूर येथील जलद बचाव पथकाचे (आरआरटी) प्रमुख व पशुवैद्यकीय अधिकारी (वन्यजीव) डॉ. रविकांत खोब्रागडे यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम पार पडली. या पथकाची ही १२२ वी यशस्वी मोहीम आहे. पथकात शूटर अजय मराठे यांच्यासह योगेश लकडे, दीपेश टेंभुर्णे, वसीम शेख, विकास ताजने, प्रफुल्ल वाटगुरे, अमोल कोरपे, अक्षय दांडेकर आणि गुरुनानक ढोरे यांनी मोलाची भूमिका बजावली.
वनविभागाच्या या यशस्वी कामगिरीमुळे परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.






