हंसराज, भंडारा :- सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत सुट्या पैशांचा प्रश्न कायमचा सुटावा आणि प्रवाशांचा प्रवास सुखकर व्हावा, या उद्देशाने प्रशासनाने ई-तिकीट मशीनमध्ये ‘ऑनलाईन स्कॅनर’ची सुविधा सुरू केली. मात्र, ‘डिजिटल इंडिया’चा हा गाजावाजा आता प्रवाशांसाठी मोठी डोकेदुखी ठरू लागला आहे. अनेक बसेसमधील स्कॅनर तांत्रिक बिघाडामुळे बंद असून, यामुळे वाहक (कंडक्टर) आणि प्रवाशांमध्ये दररोज वादाचे प्रसंग उद्भवत आहेत.
सुट्या पैशांची कटकट आणि ‘डिजिटल’ अडथळा
काही महिन्यांपूर्वी प्रशासनाने प्रवाशांच्या सुविधेसाठी तिकीट मशीनमध्ये ‘क्यूआर कोड’ स्कॅनरची सोय केली होती. सुरुवातीला या सुविधेचे प्रवाशांनी मोठ्या उत्साहात स्वागत केले. खिशात सुटे पैसे ठेवण्याऐवजी मोबाईलद्वारे झटपट तिकीट काढण्याला प्रवाशांनी पसंती दिली. मात्र, आता चित्र पालटले आहे. बहुतांश बसेसमधील हे स्कॅनर बंद पडले असून, “स्कॅनर बंद आहे, रोख पैसेच द्या,” असे उत्तर वाहकांकडून दिले जात आहे. प्रवाशांकडे रोख किंवा सुटे पैसे नसल्यास त्यांना चक्क भर रस्त्यात बसमधून खाली उतरवले जात असल्याचे धक्कादायक प्रकार समोर येत आहेत.
बसमध्ये वादाचा धुराळा; जबाबदार कोण?
स्कॅनर बंद असल्याच्या कारणावरून बसमध्ये रोजच ‘तू-तू मै-मै’ होताना पाहायला मिळत आहे. “जर प्रशासनाने सुविधा दिली आहे, तर ती तांत्रिकदृष्ट्या सक्षम का नाही?” असा संतप्त सवाल प्रवासी विचारत आहेत. तर दुसरीकडे, “मशीन अपडेट नाही किंवा सर्व्हर चालत नसेल तर आम्ही काय करणार?” अशी हतबलता वाहक व्यक्त करत आहेत. या वादात सामान्य प्रवाशाला नाहक मनस्ताप सहन करावा लागत असून, कामावर जाणाऱ्या नोकरदारांचा आणि विद्यार्थ्यांचा वेळ वाया जात आहे. प्रशासनाचे या तांत्रिक बिघाडाकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याचे चित्र दिसत आहे.
प्रवाशांना खाली उतरवण्याचा अधिकार दिला कुणी?
ऑनलाईन पेमेंटची सवय लागल्यामुळे अनेक प्रवासी आता खिशात जास्त रोख रक्कम बाळगत नाहीत. अशा वेळी केवळ स्कॅनर बंद आहे म्हणून प्रवाशांना बसमधून खाली उतरवणे हा अन्याय असल्याची भावना व्यक्त होत आहे. तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्याची जबाबदारी प्रशासनाची असताना, त्याची शिक्षा प्रवाशांना का? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.
“आम्ही आता डिजिटल व्यवहारांना प्राधान्य देतो, पण प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे आम्हाला मनस्ताप सहन करावा लागत आहे. प्रशासनाने तातडीने सर्व मशीनमधील स्कॅनर दुरुस्त करावेत किंवा जोपर्यंत तांत्रिक बिघाड आहे, तोपर्यंत वाहकांना प्रवाशांशी सौजन्याने वागण्याच्या कडक सूचना द्याव्यात,” अशी मागणी आता प्रवासी कडून करण्यात येत आहे.
आता या गोंधळावर परिवहन प्रशासन नेमकी काय कारवाई करते आणि प्रवाशांना या रोजच्या कटकटीतून कधी मुक्ती मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.