कामठी :- गेल्या काही दिवसापासून जगभरात सुरू असलेल्या भू-राजकीय घडामोडीचा फटका आता थेट सर्वसामान्याच्या खिशाला बसू लागला आहे.अपेक्षेप्रमाणे पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीला अखेर सुरुवात झाली असून पहिल्या टप्प्यात प्रति लिटर 3 रुपयांची वाढ करण्यात आल्यानंतर अवघ्या दोन दिवसात पुन्हा एका रुपयाने दरवाढ करण्यात आली आहे.मात्र चिंतेची बाब केवळ दरवाढ नसून वाढत्या किमती नंतरही बाजारपेठेत इंधनाचा मोठा तुटवडा जाणवू लागला आहे.इराण इराण आणि इजराईल यांच्यातील वाढत्या तणावामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचा पुरवठा विस्कळीत झाला आहे याचा परिणाम भारतातही जाणवू लागला असून गॅसच्या टंचाई पाठोपाठ आता पेट्रोल आणि डिझेलचा साठाही मर्यादित झाला आहे.कामठी तालुक्यातील अनेक पेट्रोलपंपावर सध्या इंधनाचा तुटवडा भासत असून नागरिकांना पेट्रोलपंपावर रांगा लावाव्या लागत आहेत. पेट्रोल डिझेलच्या किमतीत 3 रुपयांची वाढ झाल्यानंतर एक रुपयांची वाढ ही केवळ सुरुवात आहे येणाऱ्या काही दिवसात पेट्रोल डिझेलच्या दरात मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे दुसरीकडे परिस्थिती इतकी गंभीर होऊ शकते की खिशात पैसे असूनही पंपावर इंधन उपलब्ध नसेल अशी भयावह स्थिती निर्माण होण्याची चिन्हे आहेत .आजही मागील काही दिवसांपासून कामठी तालुक्यातील काही पेट्रोल पंपावर डिझेल व पेट्रोल मिळेनासे झाले आहे. इंधनाची टँचाई ही जागतिक परिस्थितीशी निगडित असल्याने नागरिकांनी संयम बाळगून उपलब्ध इंधनाचा काटकसरीने वापर करणे ही काळाची गरज आहे.जर आताच आपण सावध झालो नाही तर भविष्यात वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडण्याची भीती व्यक्त होत आहे त्यामुळे पेट्रोल डिझेलचा वापर विचारपूर्वक करणे आता अनिवार्य झाले आहे. बॉक्स:-इंधन टंचाईचा शेती कमानाही फटका-खरीप हंगाम तोंडावर आला असताना कामठी तालुक्यातील शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे.एकीकडे ग्रामीण भागातील पारंपारिक बैलजोड्या जवळपास नामशेष झाल्या आहेत.तर दुसरीकडे डिझेल टंचाईमुळे ट्रॅक्टर बंद पडल्यामुळे शेती मशागतीची कामे ठप्प पडली आहेत त्यामुळे पावसाच्या प्रतीक्षेत असलेला शेतकरी हवालदिल झाला आहे.पूर्वी बैल होते म्हणून शेतीची कामे थांबत नव्हती आता बहुतांश ठिकाणी शेती यंत्रावर अवलंबून झाली आहे.डिझेलच नसेल तर शेती कशी करायची?असा सवाल शेतकरी उपस्थित करत आहेत .सध्या कामठी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर चिंतेचे सावट असून प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी जोर धरत आहे.



