spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

धान पिकातील तुडतुडा किडीचे एकात्मिक व्यवस्थापन करण्याचे कृषी विभागाचे आवाहन

गडचिरोली :- गडचिरोली जिल्ह्यात खरीप हंगामात धान हे प्रमुख पीक असून, १७०३८६ हे. वर पेरणी झालेली असून सध्या धान पिकामध्ये तुडतुडा (Brown Plant hopper – BPH) या किडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. तुडतुडा ही कीड धानाच्या बुंध्याजवळ राहून पिकातील रस शोषून घेते. प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाल्यास झाडे पिवळी पडून वाळतात व काही ठिकाणी “हॉपर बर्न” सदृश्य परिस्थिती निर्माण होऊन उत्पादनात घट होऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी पिकाची नियमित पाहणी करून वेळीच एकात्मिक पद्धतीने उपाययोजना कराव्यात, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात येत आहे.

प्रतिबंधक उपाय :

तपकरी तुडतुड्या पासून नुकसान कमी करण्यासाठी लवकर परिपक्व होणाऱ्या वाणांचा वापर करा. नत्रयुक्त खताचा अतिरिक्त वापर टाळावा.भात पिकानंतर डाळवर्गीय पिकांची पेरणी करावी. तपकिरी तुडतुड्याच्या नियंत्रणासाठी हेक्टरी @ ४० पिवळे चिकट सापळे लावावेत. तपकिरी तुडतुडेच्या नियंत्रणासाठी हेक्टरी @२ प्रकाश सापळे लावावे. अधूनमधून भात पिकात साचलेल पाणी काढून देणे.

कीटकनाशके वापरण्यापूर्वी पिकातील पाणी काढून टाकावे आणि वनस्पतींच्या मुळा जवळ फवारणी करावी.

तुडतुडा किडीची ओळख व प्रादुर्भावाची लक्षणे

तुडतुडा कीड प्रामुख्याने धानाच्या बुंध्याजवळ व पानांच्या आड आढळून येते.

प्रौढ व पिल्ले धानाच्या खोडातील रस शोषून घेतात.

प्रादुर्भाव झालेल्या ठिकाणी पाने पिवळी पडून झाडांची वाढ खुंटते.

प्रादुर्भाव तीव्र झाल्यास झाडे वाळून तपकिरी रंगाची दिसू लागतात.

बांधापासून किंवा शेतातील विशिष्ट भागापासून पिक वाळण्यास सुरुवात झाल्यास तुडतुडा प्रादुर्भावाची शक्यता तपासावी.

एकात्मिक व्यवस्थापन

  पीक निरीक्षण :

शेतकऱ्यांनी आठवड्यातून किमान दोन वेळा धान पिकाची पाहणी करावी. विशेषतः पिकाच्या बुंध्याजवळ तुडतुडा कीड आहे का, याची तपासणी करावी. बांधावरील तसेच शेतातील दाट भागामध्ये विशेष निरीक्षण करावे.

नत्र खताचा संतुलित वापर :

नत्रयुक्त खतांचा अवाजवी वापर टाळावा. शिफारशीनुसार संतुलित खत व्यवस्थापन करावे. जास्त नत्रामुळे पिकाची कोवळी व दाट वाढ होऊन तुडतुडा किडीचा प्रादुर्भाव वाढण्यास अनुकूल परिस्थिती निर्माण होऊ शकते.

पिकातील पाण्याचे व्यवस्थापन :

शेतात सतत जास्त पाणी साचून राहणार नाही याची काळजी घ्यावी. पिकाच्या अवस्थेनुसार योग्य पाणी व्यवस्थापन करावे.

कृषी विद्यापीठाने केलेल्या शिफारशीनुसार :-

जैविक नियंत्रणाचे उपाय:-

तपकिरी तुडतुडे नियंत्रणासाठी कडुनिंब तेल ३% @ ४ मिली / प्रती १५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

तुडतुडे नियंत्रणासाठी १० दिवसांच्या अंतराने सायरोटोरिनस लिव्हिडिपेंनिस या परजीवीची प्रति एकर १,००,००० अंडी सोडावी. 2/हेक्टर दराने प्रकाश सापळे लावावे आणि संध्याकाळी 6 ते 10 दरम्यान कार्यान्वित करावे.

रासायनिक नियंत्रणाचे उपाय:

जर तपकिरी तुडतुडे ची आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडली (८-१० तुडतुडे/ओम्बी किंवा २० तुडतुडे /ओम्बी ) तर

खालीलपैकी कोणत्याही एका कीटकनाशकाची फवारणी करावी. तपकिरी तुडतुडे च्या प्रभावी नियंत्रणासाठी आसेफेट ७५ %एसपी @३० ग्रॅम / १५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

किंवा तपकिरी तुडतुडे च्या प्रभावी नियंत्रणासाठी बूप्रोफेझिन २% एससी @ २५ मिली / १५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. किंवा फिप्रोनिल ४० % एससी @ ४० मिली / १५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. किंवा इमिडाक्लोप्रिड १७.८ एसएल @ ५ मिली / १५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. किंवा थियामेथॉक्सम २५% डब्ल्यूजी @ ५ ग्रॅम / १५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

शेतकऱ्यांनी घ्यावयाची विशेष दक्षता

तुडतुड्याचा प्रादुर्भाव दिसताच घाबरून वारंवार कीटकनाशकांची फवारणी करू नये. प्रथम किडीची अचूक ओळख करून घ्यावी व प्रादुर्भावाची तीव्रता तपासावी. आर्थिक नुकसान पातळी ओलांडल्यासच आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. कीटकनाशकांची फवारणी करताना लेबलवरील सूचना, शिफारशीत मात्रा व सुरक्षा उपायांचे काटेकोरपणे पालन करावे.

धान पिकातील तुडतुडा किडीचा प्रादुर्भाव आढळल्यास शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, सहाय्यक कृषी अधिकारी तसेच कृषी विभागाच्या संबंधित अधिकारी/कर्मचाऱ्यांशी संपर्क साधून मार्गदर्शन घ्यावे, असे आवाहन  प्रिती हिरळकर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, गडचिरोली. यांनी केले आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.