spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

आदिवासी संस्कृतीला जागतिक दर्जा प्राप्त करून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न – आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके

– जनजाती गौरव दिनानिमित्त चेतना परिषदेत मान्यवरांची कटिबद्धता

नागपूर :- आदिवासी परंपरेतील देव, दैवत आणि अस्मिता यांची जपणूक करण्यासाठी व आदिवासी संस्कृतीला जागतिक दर्जा प्राप्त करून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. हे वैभव अधिकाधिक माध्यमातून पुढे येण्यासाठी समाजातील चिंतकांनी, संशोधकांनी यासाठी अधिक कटिबद्ध होण्याचे आवाहन आदिवासी विकास मंत्री प्रा. डॉ.अशोक वुईके यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात केले.

क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या 150 व्या जयंती निमित्त आयोजित राज्यस्तरीय जनजातीय गौरव दिवस अंतर्गत आज दुसऱ्या दिवशी चेतना परिषदेचे आयोजन करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. सामाजिक कार्यकर्ते पद्मश्री चैतराम पवार यांच्या अध्यक्षस्थानी झालेल्या या चेतना परिषदेस विधान परिषद सदस्य कृपाल तुमाने, मध्यप्रदेशचे उपसचिव लक्ष्मणसिंह मडकाम, माजी आयपीएस अधिकारी मधुकरराव गावित, मध्यप्रदेश राजभवनच्या जनजाती विशेषज्ञ डॉ. दीपमाला रावत, प्रकाश गेडाम यांची प्रमुख उपस्थिती होती.

आदिवासी विकास विभाग आदिवासींच्या कल्याणासाठी सातत्याने प्रयत्नशील राहील अशी ग्वाही यावेळी आदिवासी विकास मंत्री प्रा. डॉ.अशोक वुईके यांनी दिली. मध्यप्रदेशचे उपसचिव लक्ष्मणसिंह मडकाम यांनी सांगितले की, जनजातीय समुदायांनी शाश्वत व सर्वसमावेशक विकासावर भर दिला पाहिजे. भारतीय संविधानाच्या कलम 342 मधे नमूद आपल्या घटनात्मक हक्कांबद्दल जागरूक असले पाहिजे. जंगल संवर्धन करून आर्थिक प्रगती साध्य केली पाहिजे, आर्थिक दृष्ट्या साक्षर झाले पाहिजे. आपल्या प्राचीन संस्कृतीचे व अस्मितेचे रक्षण केले पाहिजे. त्यांनी आदिवासींच्या प्रथापरंपरामागील वैज्ञानिक दृष्टिकोन काय होता व आदिवासी संस्कृती कशाप्रकारे मूल्यांची जपणूक करणारी होती याचे महत्व विशद केले.

मध्यप्रदेश राजभवनाच्या जनजाती विशेषज्ञ डॉ. दीपमाला रावत यांनी मनोगत व्यक्त करताना आदिवासी स्त्रियांच्या प्रश्नांवर भाष्य केले. भारतीय आदिवासी स्त्रियांच्या वेशभूषेत विविधता आढळते. आदिवासी परंपरा जपण्यात स्त्रियांची भूमिका जेवढी महत्त्वपूर्ण आहे त्याच प्रमाणे आदिवासी मुलींनी आता शैक्षणिक प्रगती करून स्वतःचे अस्तित्व निर्माण केले पाहिजे. निसर्ग रक्षण करणाऱ्या आदिवासी स्त्रिया आहेत म्हणून आदिवासी कुटुंबात मातृसत्ताक परंपरेला अधिक स्थान असल्याने स्त्रियांनी समाजाच्या मुख्य प्रवाहात येणे काळाची गरज आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. पद्मश्री चैतराम पवार यांनी आदिवासींना जल, जंगल आणि पर्यायाने पर्यावरण संवर्धनाकरिता सामूहिकरित्या प्रयत्न करून आपला विकास कसा साध्य करता येईल याबद्दल मार्गदर्शन केले.

सर्वप्रथम भारतमाता व क्रांतिसूर्य बिरसा मुंडा यांचे प्रतिमा पूजन व वंदेमातरम गायनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचे पहिल्या सत्राचे सूत्रसंचालन डॉ. प्रकाश मसराम यांनी तर दुसऱ्या सत्राचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रकाश गेडाम यांनी केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Popular Articles