spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

सर्पमित्रांना रेस्क्यू साहित्याचे वाटप; सुरक्षित सर्प बचावावर भर!,

– खापा वनपरिक्षेत्र अधिकारी विजय गंगावने यांच्या हस्ते साहित्य वितरण; नियमबाह्य कृत्ये करणाऱ्यांना कारवाईचा इशारा

खापा, वार्ताहर :- मानव–वन्यजीव संघर्ष कमी करण्यासोबतच सर्प बचावाचे कार्य अधिक सुरक्षित आणि जबाबदारीने व्हावे, या उद्देशाने खापा वनपरिक्षेत्र अधिकारी विजय गंगावने यांच्या हस्ते सर्पमित्रांना आवश्यक रेस्क्यू साहित्याचे वाटप करण्यात आले.

या वेळी खापरखेडा येथील सर्पमित्र दद्दू गणवीर, मयूर कनोजे व रजत गुप्ता, तसेच खापा वनपरिक्षेत्रातील सर्पमित्र विशाल शेंडे व प्रेम खडसे यांना स्नेक रेस्क्यू हुक, रेस्क्यू बॅग आणि हेडलॅम्प आदी साहित्य देण्यात आले.

“सर्प बचाव करताना सुरक्षिततेला प्राधान्य द्या”

मानवी वस्तीत आढळणाऱ्या सापांना कोणतीही इजा न करता सुरक्षितपणे नैसर्गिक अधिवासात सोडण्याच्या कार्यात सर्पमित्रांची भूमिका महत्त्वाची आहे. मात्र, साप पकडताना स्वतःची, नागरिकांची आणि सापाची सुरक्षितता जपणे आवश्यक आहे. सापांसोबत खेळ करणे, प्रदर्शन किंवा स्टंट करणे टाळावे, अशा सूचना वनविभागाकडून देण्यात आल्या.

वनविभागाच्या मार्गदर्शनाबाहेर नियमांचे उल्लंघन करून साप पकडणे अथवा त्यांचे प्रदर्शन करणे आढळल्यास संबंधितांवर वन्यजीव संरक्षणविषयक कायद्यानुसार कारवाई होऊ शकते, असा इशाराही देण्यात आला.

नागरिकांनी घराजवळ किंवा परिसरात साप आढळल्यास त्याला पकडण्याचा किंवा मारण्याचा प्रयत्न करू नये. अशा वेळी वनविभागाच्या मार्गदर्शनाखाली कार्य करणाऱ्या प्रशिक्षित सर्पमित्रांची मदत घ्यावी, असे आवाहन करण्यात आले.

साप किंवा अन्य वन्यजीव आढळल्यास वनविभागाच्या १९२६ या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले. सुरक्षित सर्प बचाव, वन्यजीवांचे संरक्षण आणि मानव–वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी नागरिकांनी वनविभागाला सहकार्य करावे, असेही सांगण्यात आले.

Popular Articles