NCMC कार्डच्या तिकीट आकारणीत कथित अनियमितता; तात्काळ चौकशीची ग्राहक पंचायतीची मागणी

0
17

– अतिरिक्त आकारलेली रक्कम प्रवाशांना परत द्या; NCMC व्यवहारांचे ऑडिट करण्याची मागणी

नागपूर :- नागपूर शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत वापरल्या जाणाऱ्या NCMC कार्डच्या माध्यमातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून तिकीट मशीनद्वारे अपेक्षेपेक्षा अधिक रक्कम आकारली जात असल्याचा गंभीर आरोप ग्राहक पंचायत नागपूर जिल्ह्याने केला आहे. या कथित अनियमिततेची तातडीने चौकशी करून प्रवाशांकडून अतिरिक्त आकारलेली रक्कम परत करण्यात यावी, तसेच NCMC कार्ड व्यवहारांचे स्वतंत्र ऑडिट करण्यात यावे, अशी मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीने केली आहे. ग्राहक पंचायत नागपूर जिल्ह्याचे कार्याध्यक्ष संजय धर्माधिकारी आणि अध्यक्ष गणेश शिरोळे यांनी राज्याचे मुख्यमंत्री यांना पत्र पाठवून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. प्रवाशांकडून येणाऱ्या तक्रारींच्या आधारे हा मुद्दा पुढे आणण्यात आला आहे. ग्राहक पंचायतीच्या म्हणण्यानुसार, NCMC कार्डवरून एका तिकिटाची रक्कम घेतली असतानाही वाहनातील तिकीट मशीनद्वारे चार तिकिटांची रक्कम आकारली गेल्याच्या तक्रारी प्रवाशांकडून करण्यात आल्या आहेत. अतिरिक्त आकारलेली रक्कम परत मिळण्याबाबत विभाग नियंत्रक, नागपूर यांच्याकडे मार्गदर्शन मागण्यात आले; मात्र त्यातून समाधानकारक मार्गदर्शन मिळाले नसल्याचे ग्राहक पंचायतीने म्हटले आहे. कार्ड रिचार्जमध्येही पारदर्शकतेचा अभाव ? NCMC कार्ड रिचार्ज करताना १.०६ टक्के कमी रक्कम जमा होत असल्याचा दावा करण्यात आला आहे. कार्ड रिचार्ज अथवा व्यवहाराची माहिती ग्राहकांना SMS, ई-मेल किंवा WhatsApp च्या माध्यमातून मिळत नसल्याने व्यवहाराच्या पारदर्शकतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. तसेच कार्ड सुरू करण्यापूर्वी त्याची योग्य तपासणी होत नसल्याने प्रवासा दरम्यान तिकीट मशीन बंद पडणे, इंटरनेट सेवा उपलब्ध नसणे आदी तांत्रिक अडचणींना प्रवाशांना सामोरे जावे लागत असल्याचा आरोपही ग्राहक पंचायतीने केला आहे. त्यामुळे प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. महिला प्रवाशांबाबतही तक्रार विशेषतः महिला प्रवाशांच्या बाबतीतही कार्डमधून रक्कम जमा असतानादेखील पूर्ण तिकीट आकारले जात असल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे. या प्रकाराचीही चौकशी करून प्रवाशांकडून चुकीच्या पद्धतीने आकारण्यात आलेली रक्कम परत करण्याची मागणी करण्यात आली आहे. एजन्सीला आर्थिक फायदा करून देण्याचा आरोप ग्राहक पंचायतीने या संपूर्ण व्यवस्थेबाबत आणखी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. NCMC कार्ड व्यवस्थेचे कंत्राट ज्या एजन्सीला देण्यात आले आहे, त्या एजन्सीला आर्थिक फायदा व्हावा या उद्देशानेच ही व्यवस्था करण्यात आली असल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे. तसेच संबंधित प्रशासनाची जबाबदारी असतानाही याची पुरेशी तपासणी न होता योजना वेगाने लागू करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. या सर्व प्रकारामुळे MSRTC व NCMC कार्ड व्यवस्थेतील आर्थिक व्यवहार, तिकीट मशीनची कार्यप्रणाली तसेच प्रवाशांना मिळणाऱ्या व्यवहाराच्या माहितीतील पारदर्शकता याबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले असल्याचे ग्राहक पंचायतीने म्हटले आहे. स्वतंत्र चौकशीसह ऑडिटची मागणी मुख्यमंत्र्यांनी या तक्रारीची तातडीने दखल घेऊन स्वतंत्र चौकशी करावी, प्रवाशांकडून अतिरिक्त आकारलेली रक्कम परत मिळवून द्यावी, NCMC व्यवहारांचे स्वतंत्र ऑडिट करावे तसेच दोषी आढळणाऱ्या संबंधितांवर नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी ग्राहक पंचायतीने केली आहे. या प्रसिद्धीपत्रकावर अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य गजानन पांडे, शहराचे अध्यक्ष अनिरुद्ध गुप्ते, जिल्हा सचिव प्रकाश भुजाडे, शहर सहसचिव समीर जोशी, तसेच संजय जोशी, संजय देशपांडे, प्रसाद पोफळी, नगसेविका माया हाडे, शहर उपाध्यक्ष उदय दिवे, जिल्हा उपाध्यक्ष अरविंद हाडे, बब्बू शेख, विजय पांडे, संध्या कुर्वे, अँड. स्मिता देशपांडे, तृप्ती आकांत, संध्या पुनियानी, श्रीपाद हत्तमस आदींच्या सह्या आहेत. ग्राहकांच्या हिताचे संरक्षण आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील आर्थिक व्यवहारात पारदर्शकता राखण्यासाठी या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होणे आवश्यक असल्याचे ग्राहक पंचायतीने स्पष्ट केले आहे.­