नागपूर :- माहितीचा अधिकार अधिनियमाअंतर्गत माहिती शुल्क अर्जदारास कळविण्याच्या कार्यपध्दतीत बदल करण्यात आला असून ठराविक कालावधीत माहिती शुल्क कळविण्याची सक्ती जनमाहिती अधिकाऱ्यावर राहिलेली नाही. अर्ज प्राप्त झाल्यापासून 30 दिवसांच्या आत अर्जदारास माहिती उपलब्ध करुन देणे मात्र पूर्वीप्रमाणेच बंधनकारक आहे.
माहितीचा अधिकार अधिनियमाअंतर्गत जनमाहिती अधिकारी यांनी माहितीचा अर्ज प्राप्त झाल्यानंतर शक्य तितक्या शिघ्रतेने आणि कोणत्याही परिस्थितीत विनंती केल्यापासून 30 दिवसांच्या आत अर्जदारास माहिती देणे आवश्यक आहे. तसेच कलम 7 (3)(क) अन्वये अतिरिक्त शुल्काबाबतची सूचना पाठविल्यानंतर व शुल्क प्रदान केल्याचा कालावधी हा 30 दिवसांच्या कालावधीची परिगणना करण्याच्या प्रयोजनार्थ वगळण्याची तरतूद आहे.
माहितीच्या अधिकाराअंतर्गत प्राप्त होणाऱ्या अर्जा मध्ये माहिती पुरविण्यासाठी शुल्क आकारावयाचे असल्यास अधिनियमातील तरतुदीनुसार व प्रत्येक प्रकरणातील परिस्थिती विचारात घेऊन माहितीची पृष्ठसंख्या व टपालखर्चासह, माहितीच्या शुल्काची रक्कम टपालाने किंवा ई-मेलव्दारे शक्य तितक्या लवकर अर्जदारास कळवावी, अशी सुधारणा करण्यात आली आहे. यापूर्वी जनमाहिती अधिकाऱ्याने माहिती अर्ज प्राप्त झाल्यानंतर 10 दिवसापर्यत माहितीच्या शुल्काची रक्कम कळवायची होती.




