वाघानं चाळीस हजाराची गाय मारली
वृद्ध महिलेचा वनकार्यालयात संताप
शासनाच्या निकषा विषयी संतापाचा सुर
सचिन चौरसिया रामटेक २४:– रामटेक वनविभाग कार्यालय ( प्रादेशिक ) अंतर्गत येणाऱ्या पटगोवारी येथील रहीवाशी असलेल्या एका वृद्ध महिलेची एक गाय वाघाच्या हल्ल्यात ठार तर गोऱ्हा जखमी झाल्याची घटना नुकतीच काही दिवसांपूर्वी घडली. दरम्यान यावेळी वृद्ध महिलेला शासनाकडुन योग्य मोबदल्याची आस असतांना शासनाकडून फक्त अकरा हजार रुपयेच त्या म्हातारीच्या मस्तकी मारण्यात आल्याने तिने रामटेक वनपरीक्षेत्र अधिकारी कार्यालयात येऊन ‘ वाघानं चाळीस हजाराची गाय मारली न् अकरा हजार देता का साहेब ‘ असे म्हणत शासनाने ठरवुन दिलेल्या निकषाबाबद संताप व्यक्त केला.
कमलाबाई पुरुषोत्तम भोयर राहणार पटगोवारी असे संतापलेल्या वृद्धेचे नाव आहे. रामटेक वनपरीक्षेत्र अधिकारी कार्यालय ( प्रादेशिक ) अंतर्गत येत असलेल्या पटगोवारी शिवारात नुकत्याच काही दिवसांपुर्वी गाय व गोऱ्हा चारत असतांना अचानक वाघाने हल्ला चढविला. यात गाय ठार झाली तर गोऱ्हा जखमी झाला. आर्थिक विवंचनेला संघर्ष देत गोऱ्हाचे उपचार तर कमलाबाईने कसेबसे केले मात्र यादरम्यान कदाचित ‘ शासन आपल्याला गाईचा मोबदला योग्य प्रमाणात देईल व त्यातुन पुढे काहीतरी तडजोड करु ‘ अशी अपेक्षा तिने शासनाकडून केली असावी मात्र शासनाचा केवळ अकरा हजार रुपयांचा मोबदला पाहुन ती थक्क झाली. आता फक्त अकरा हजार रुपयात आपण काय तरी करावे ? गाईच्या मृत्युने तथा गोऱ्हा च्या उपचारासाठी झालेल्या खर्चाची पोकळी कशी भरून काढायची असे प्रश्न कमलाबाईपुढे उभे ठाकले. आणि याच विवंचनेतुन तिने रामटेक चे वनपरीक्षेत्र अधिकारी कार्यालय गाठुन शासनाच्या विरोधात संताप व्यक्त केला.
वाघांच्या हल्ल्यात वाढ
गेल्या एक दीड वर्षांमध्ये विशेषतः वाघांकडून मानवावर तथा पाळीव जनावरांवर होत असलेल्या हल्ल्यांच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. कधी मानवावर तर कधी पाळीव जनावरांवर सातत्याने होणाऱ्या हल्ल्यांमुळे जनसामांन्यात मोठा रोष उत्पन्न होत आहे. मानव वन्यप्राणी संघर्ष टाळणे सहज शक्य होत नसेल तर शेतींना लागून असलेल्या जंगल परिसराला कुंपण करणे, वाघांची संख्या प्रमाणापेक्षा जास्त वाढली असेल तर काही वाघांना इतरत्र हलविणे आदी. उपाय वनविभागाने करणे आज गरजेचे असल्याचे काही तज्ञ मंडळींचे म्हणने आहे.


