spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

कोर्टात अर्ज दिल्याचा राग; दोघा भावंडांना रॉडने मारहाण

छत्रपती संभाजीनगर :- हायवा जाळल्याची फिर्याद दाखल करण्यासाठी कोर्टात अर्ज दिल्याचा राग मनात धरून दोघा भावंडांना जीवे मारण्याच्या उद्देशाने पाठलाग करून लोखंडी रॉड तसेच लाकडी दांड्याने मारहाण करून जखमी करण्यात आल्याची घटना गुरुवारी (दि.५) रात्री सोलापूर-धुळे महामार्गावर घडली. या प्रकरणी १२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी यातील चार आरोपींना अटक केली आहे.

या विषयी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नामदेव रोरे (३६ रा. गट क्र. १३, सिडको गार्डनसमोर, वडगाव को.) यांचा हायवा ट्रक काही दिवसांपूर्वी भांगसी माता गड परिसारात जाळण्यात आला होता. या प्रकरणी बिरजू तरैय्यावाले व अक्षय बडोगे (दोघ रा. तिसगाव) यांच्याविरुद्ध फिर्याद दाखल करण्यासाठी नामदेव रोरे यांनी कोर्टात अर्ज दाखल केला होता.

याचा राग मनात धरून बिरजू तरैय्यावाले, विक्की सलामपुरे, अक्षय बडोगे, अमृत सलामपुरे, गुड्डू खान यांनी गुरुवारी रात्री पावणे बारा वाजेच्या सुमारास सोलापूर – धुळे महामार्गावरील साजापूर शिवारात रोरे यांची कार अडवली. यावेळी बिरजू याने हा लई माजला, आमच्यावर कोर्टातून गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न करतोय.

आता हा सापडला याला जिवंत सोडू नका असे म्हणत त्याने रोरे यांच्या छातीत लाथ मारून त्यांना खाली पाडले. त्यानतंर बिरजू व विक्की याने लोखंडी रॉडने तर अक्षय, अमृत व गुड्डू खान यांनी रोरे यांना लाकडी दांड्याने मारहाण करून जखमी केले. दरम्यान भावाला मारहाण होत असल्याचे समजल्याने नामदेव यांचा भाऊ योगेश रोरे हे घटनास्थळाकडे येत असताना योगेश सलामपुरे, योगेश शिंदे या सर्वांनी मिळून योगेश रोरे यांना बेदम मारहाण करून जखमी केले. पाठलाग करून लोखंडी रॉडने तसेच लाकडी दांड्याने मारहाण केल्याप्रकरणी नामदेव रोरे यांनी ९ नोव्हेंबर रोजी दिलेल्या तक्रारीवरून बिरजू तरैय्यावाले, विक्की सलामपुरे, अक्षय बडोगे, अमृत सलामपुरे, गुड्डू खान, योगेश सलामपुरे, योगेश शिंदे, गोरख भामकर, करण कांबळे तसेच त्यांच्या तीन अनोळखी साथीदारांविरुद्ध एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी ४ आरोपींना अटक केली असल्याचे तपासी अधिकारी संजय गिते यांनी सांगितले.

Popular Articles