संदीप कांबळे,कामठी :- सौंदर्य केवळ बाह्य रूपापुरते मर्यादित नसून, प्रत्येक मुलीच्या मनात आत्मविश्वासाची भावना निर्माण होणेही तितकेच महत्त्वाचे आहे. याच सामाजिक जाणिवेतून अंशिता ब्युटी अकॅडमी, कामठी यांच्या वतीने कामठी रेल्वे स्टेशन समोरील सराय नगर मधील वस्तीगृहातील मुलींसाठी मोफत केशकर्तन व क्लीनअप सेवा देण्याचा संवेदनशील उपक्रम नुकताच राबविण्यात आला. या उपक्रमामुळे मुलींच्या चेहऱ्यावर आनंदासोबतच आत्मविश्वासाचे हास्य फुलले.
अंशिता ब्युटी अकॅडमीच्या पुढाकारातून राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचा उद्देश वस्तीगृहातील मुलींना वैयक्तिक निगा राखण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यासोबतच त्यांच्या मनातील संकोच दूर करणे आणि व्यक्तिमत्त्वाकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याचा आत्मविश्वास निर्माण करणे हा होता. अकॅडमीच्या चमूने कोणतेही शुल्क न घेता मुलींना ही सेवा उपलब्ध करून दिली.
या उपक्रमादरम्यान मुलींसाठी केशकर्तन तसेच चेहरा स्वच्छता सेवा देण्यात आली. सेवा घेतल्यानंतर मुलींच्या चेहऱ्यावर उमटलेले आनंदाचे भाव आणि हास्य हेच या उपक्रमाचे खरे समाधान असल्याची भावना अंशीता ब्युटी एकेडमीच्या स्वाती कावळे यांनी व्यक्त केली.
“आमचा छोटासा प्रयत्न, त्यांच्या आत्मविश्वासाला नवी दिशा देण्यासाठी,” या भावनेतून हा उपक्रम साकारण्यात आला. आर्थिक किंवा अन्य कारणांमुळे अनेक मुलींना वैयक्तिक निगा राखण्याच्या सुविधा नियमितपणे मिळत नाहीत. ही बाब लक्षात घेऊन अंशिता ब्युटी अकॅडमीने सामाजिक बांधिलकी जपत हा उपक्रम हाती घेतला.
“प्रत्येक मुलगी सुंदर आहे; मात्र तिच्या व्यक्तिमत्त्वातील आत्मविश्वास अधिक खुलविण्यासाठी छोटासा आधार देण्याचा आमचा प्रयत्न आहे,” असे स्वाती कावळे यांनी सांगितले.
या उपक्रमात स्वाती कावळे,अंशिता कावळे, सुनीता भोंडे, वैशाली पराते, सुनीता आगाशे, खुशी पंचबुद्ध, सारिका डांगे, निधी विघे, स्मिता मोरे आणि शुभांगी श्रावणकर यांनी मोलाची भूमिका बजावली.
या उपक्रमामागे कोणताही व्यावसायिक हेतू नसून सामाजिक संवेदना आणि माणुसकीची जाणीव हा केंद्रबिंदू असल्याचे दिसून आले. मुलींच्या चेहऱ्यावर उमटलेले समाधान आणि आनंद पाहून उपक्रमात सहभागी झालेल्या चमूलाही समाधान मिळाले.
“आपल्या छोट्याशा सहकार्याने त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलू दे आणि त्यांच्या आयुष्यातील एक पाऊल सुंदर उद्याच्या दिशेने पडू दे,” या सकारात्मक संदेशातून अंशिता ब्युटी अकॅडमीने सौंदर्यसेवेला सामाजिक जबाबदारीची जोड दिली.
अशा उपक्रमातून गरजू मुलींना केवळ सेवा मिळत नाही, तर “आपल्यासाठीही कोणीतरी विचार करते” ही आपलेपणाची भावना त्यांच्या मनात निर्माण होते. आत्मविश्वासाची ही छोटीशी ठिणगी त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला सकारात्मक दिशा देऊ शकते. त्यामुळे अंशिता ब्युटी अकॅडमीचा हा उपक्रम सामाजिक संवेदनशीलतेचा आणि माणुसकीचा प्रेरणादायी आदर्श ठरला आहे.



