यवतमाळ :- युवकांच्या अंगी दडलेल्या कलागुणांना वाव देण्यासाठी तसेच राष्ट्रीय एकात्मतेला चालना देण्यासाठी दरवर्षीप्रमाणे यावर्षीही जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. केंद्र शासनाच्या वतीने आयोजित होणारा हा महोत्सव दि. 7 नोव्हेंबर रोजी यवतमाळ येथे पार पडणार आहे. या महोत्सवात वक्तृत्व स्पर्धा, कथालेखन, चित्रकला, लोकनृत्य (सांघिक), लोकगीत (सांघिक), कविता लेखन, नवोपक्रम (विज्ञान प्रदर्शन) अशा विविध कलाप्रकारांचा समावेश करण्यात आला आहे.
वयोगट 15 ते 29 वर्षांतील युवक-युवतींना या स्पर्धांमध्ये सहभागी होता येणार आहे. सहभागी स्पर्धकांचे वय 12 जानेवारी 2025 रोजी 15 ते 29 वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे. त्यासाठी जन्मतारखेचा दाखला किंवा आधारकार्डाची सत्यप्रत सोबत जोडणे बंधनकारक आहे. स्पर्धकांनी सादरीकरणासाठी लागणारे साहित्य स्वतःकडे ठेवावे, मात्र स्टेज व विद्युत व्यवस्था संयोजन समितीमार्फत पुरविली जाईल. स्पर्धेदरम्यान असभ्य वर्तन अथवा धार्मिक व राजकीय भावना दुखावणारे सादरीकरण आढळल्यास संबंधित स्पर्धक अपात्र ठरविण्याचा अधिकार संयोजन समितीकडे राहील. तसेच पंचांचा निर्णय अंतिम व बंधनकारक राहील, याची सर्व स्पर्धकांनी नोंद घ्यावी.
स्पर्धेसाठी अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख 6 नोव्हेंबर पर्यंत सायं. 4 वाजेपर्यंत असून, अर्ज जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, यवतमाळ येथे स्वीकारले जातील. जिल्हा क्रीडा अधिकारी घनश्याम राठोड यांनी युवक-युवतींना या जिल्हास्तरीय युवा महोत्सवात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.



