– रुग्णांना चांगले उपचार देण्यासाठी मनपा कटिबद्ध – अतिरिक्त आयुक्त वसुमना पंत
नागपूर :- गांधीनगरातील नागपूर महानगरपालिकेच्या इंदिरा गांधी रुग्णालयात टेलिमेडीसीन केंद्राचे उद्घाटन अतिरिक्त आयुक्त वसुमना पंत यांच्या हस्ते आज (ता. ४) करण्यात आले. या सुविधेमुळे तज्ज्ञ डॉक्टरांकडून रुग्णांचे रोगनिदान होण्यास मदत मिळणार असल्याचे प्रतिपादन वसुमना पंत यांनी यावेळी केले.
कार्यक्रमाला मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, डीजी स्वास्थ्य फाउंडेशन चे संस्थापक संदीप कुमार, एचसीएल फाउंडेशन शैलेश आवळे, मनपाचे अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, एचसीएलएफचे व्यवस्थापक पियूष वानखेडे, इंदिरा गांधी रुग्णालयाच्या डॉ. मंगला पुरी यांच्यासह अधिकारी व कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी बोलताना अतिरिक्त आयुक्त वसुमना पंत यांनी महानगरपालिकेच्या रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना चांगली आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी गेल्या वर्षीपासून टेलिमेडीसीन केंद्रांची सुरूवात केली आहे. या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत असल्याने इंदिरा गांधी रुग्णालयात या सुविधेचे केंद्र सुरू करण्यात आले आहे. रुग्णांना तज्ज्ञ डॉक्टरांकडून तात्काळ मार्गदर्शन मिळणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी बोलताना वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर यांनी टेलिमेडीसीन केंद्रांमध्ये रुग्णांना १७ प्रकारच्या तज्ज्ञांकडून मार्गदर्शन मिळू शकणार आहे. या प्रकारचे केंद्र जागनाथ बुधवारी व चिंचभवन भागातील मनपाच्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये उपलब्ध झाली आहे. या सुविधेमुळे प्राथमिक आरोग्य केंद्रातील ओपीडी रुग्णांची संख्या वाढण्यास मदत होईल, असे ते म्हणाले. नागपूर महानगरपालिका डीजीस्वास्थ फाऊंडेशनच्या सहकार्याने हे टेलिमेडीसीन केंद्र सुरू करण्यात आले असून, या उपक्रमाला एचसीएल या कंपनीने सीएसआर अंतर्गत निधी उपलब्ध करून दिला आहे.
प्रारंभी अतिरिक्त आयुक्त वसुमना पंत यांनी दीपप्रज्वलन केले, त्यानंतर फित कापून या केंद्राचे उद्घाटन केले. एचसीएलच्या असोशिएट संचालक सीमी सुरी यांनी व्हीसीच्या माध्यमातून संवाद साधला. या उपक्रमाला एचसीएलद्वारे यापुढेही सहकार्य राहील, असा विश्वास व्यक्त केला. यावेळी वसुमना पंत यांच्या हस्ते रुग्णांना पोषण आहार किटचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डीजी स्वास्थ्य फाऊंडेशनचे संदीपकुमार यांनी केले तर आभार पियुष वानखेडे यांनी मानले.




