नागपूर १५ : जेवणानंतर किंवा संध्याकाळी चहा बरोबर एखादा समोसा, जलेबी, वडापाव किंवा लाडू खाणे – ही अनेकांची रोजची सवय आहे. पण आता ही सवय तुमचं आरोग्य घातक पातळीवर घेऊन जाऊ शकते, असा इशारा थेट आरोग्य मंत्रालयाने दिला आहे. त्यामुळे नागपूर शहरात लवकरच समोसा आणि जलेबीसारख्या लोकप्रिय खाद्यपदार्थांच्या दुकानांवर ‘स्वास्थ्य चेतावनी बोर्ड’ लावले जाणार आहेत. सिगरेटप्रमाणे या खाद्यपदार्थांनाही ‘धोकादायक’ अशी श्रेणी देण्यात येणार आहे.
आरोग्य मंत्रालयाची नविन मोहीम – “लोक सजग व्हावेत”
आरोग्य मंत्रालयाने स्पष्टपणे सांगितले की, समोसा, जलेबी, चहा-बिस्किट, लाडू, वडापाव यामध्ये जास्त प्रमाणात साखर, मीठ, तेल व ट्रान्सफॅट असते. या घटकांचा दररोज वापर शरीरात अनेक गंभीर आजारांना निमंत्रण देतो – जसे की डायबेटीस, उच्च रक्तदाब, हृदयरोग, लठ्ठपणा आणि इतर चयापचयाशी संबंधित आजार. त्यामुळे आता या खाद्यपदार्थांच्या दुकानांवर चेतावनी स्वरूपात लिहिले जाईल –
“समजूतदारपणाने खा – तुमचं भविष्य तुम्हाला धन्यवाद देईल.”
एम्स नागपूरसह केंद्रीय संस्थांना आदेश
मंत्रालयाने एम्स नागपूर आणि देशातील इतर केंद्रीय संस्थांना आदेश दिले आहेत की, त्यांनी त्यांच्या कॅफेटेरिया, हॉस्पिटल कॅंटीन आणि सार्वजनिक खाण्याच्या ठिकाणी पोस्टर्स लावावेत. या पोस्टरद्वारे लोकांना हे माहिती मिळेल की ते जे खाणार आहेत त्यात किती साखर आणि फॅट आहे आणि त्याचा त्यांच्या आरोग्यावर काय परिणाम होऊ शकतो.
एम्स नागपूरच्या अधिकाऱ्यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितले की, “सध्या लाडू, समोसा, वडापाव, भजी, पकौडा यासारख्या पदार्थांची तपासणी सुरू आहे. लवकरच कॅफेटेरिया आणि सार्वजनिक परिसरात ही आरोग्यसूचक बोर्डे लावली जातील.”
‘लोकांना काय खात आहेत हे माहिती असणे अत्यंत गरजेचे’ – तज्ञ डॉक्टर
मधुमेह व आहारतज्ज्ञांनी सांगितले की सरकार कोणताही पदार्थ बंद करत नाही, पण लोकांना योग्य माहिती मिळाली तर ते स्वतःच निर्णय घेऊ शकतात.
“एक रसगुल्ला खाण्याआधी जर तुम्हाला समजलं की त्यामध्ये ६ चमचे साखर आहे, तर तुम्ही दोनदा विचार कराल,” असे म्हणत एका डॉक्टरने सांगितले की – “लोकांना त्यांच्या खाण्याच्या निवडीबाबत सजग करणे हा सरकारचा उद्देश आहे.”
लठ्ठपणा वाढत चाललेली नवी महामारी!
आरोग्य मंत्रालयाच्या अहवालानुसार, जर खाण्याच्या सवयी अशाच राहिल्या, तर २०५० पर्यंत देशातील ४० कोटी लोक लठ्ठपणाच्या विळख्यात अडकतील. या संदर्भात एक गंभीर इशारा देताना मंत्रालयाने म्हटले की –
“मोटाप्याच्या बाबतीत अमेरिका नंतर दुसऱ्या क्रमांकावर भारत असेल.”
इतकंच नव्हे तर अल्पवयीन मुलेही या चुकीच्या आहारामुळे लहान वयातच लठ्ठ होत आहेत. यामुळे मधुमेह आणि हृदयविकाराची लक्षणेही लहान वयात दिसू लागली आहेत.
@filephoto



