सचिन चौरसिया रामटेक ०८ :- विदर्भाचे पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धापेवाड्यातील स्वयंभू श्री विठ्ठल रक्मिणी मंदिरात दर्शनासाठी रविवारी सकाळपासून गर्दी व्हायला सुरुवात झाली. ‘जय जय विठोबा रखुमाई’, असा जयघोष व टाळ मृदंगाचा नादात आषाढी एकादशीनिमित्त विदर्भ, छत्तीसगड आणि मध्यप्रदेशातील कानाकोपऱ्यातून मोठ्या प्रमाणात वारकरी आणि दर्शनार्थी येतात. देवशयनी आषाढी एकादशीच्या निमित्ताने विठ्ठलभक्तांचा महासागर उसळला. “विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल” च्या गजरात संपूर्ण गाव भक्तिरसात न्हालेला दिसून आला. शुक्रवारी पहाटे ६.३० वाजता सार्वजनिक बांधकाम विभागाचे चंद्रशेखर गिरी आणि प्रभाकर डहाके यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेची पूजा करून मंदिराचे दरवाजे भाविकांसाठी उघडण्यात आले. यावर्षी एकादशी रविवारच्या दिवशी आल्यामुळे जवळपास पावणे दोन लाख भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली. भक्तांसाठी विशेष अन्नदानाची सोय करण्यात आली होती. कुणालाही कोणताही त्रास होऊ नये म्हणून विश्व मानव रूहानी केंद्राचे २०० स्वयंसेवक, कमांडो आर्मी पोलिस स्कूलचे विद्यार्थी, आर्ट ऑफ लिव्हिंगचे सदस्य, बजरंग दल सावनेरचे कार्यकर्ते आणि सावनेरहून आलेल्या महिलांनी सेवा दिली. सायंकाळी ५ वाजता कोलबास्वामी मठ, मकरंदपुरी महाराज मठ आणि वारामाय मठ यांच्या भव्य दिंड्यांचे नगरप्रदर्शन झाले. या दिंड्यांमध्ये गावकरी आणि भक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले. भाविकांसाठी पाणी, महाप्रसाद व चहा वाटपाची सोय विविध स्वयंसेवी संस्था व सेवेकऱ्यांनी केली होती. सुरक्षा व्यवस्था चोख ठेवण्यात आली होती. जागोजागी पोलिस बंदोबस्त, सीसीटीव्ही कॅमेरे आणि मार्गदर्शन फलक लावण्यात आले होते. भाविकांची सोय लक्षात घेता सावनेर व कळमेश्वर येथून यात्रा स्पेशल बसेस चालवण्यात आल्या होत्या. यावेळी उपस्थित असलेले पोलिस महानिरीक्षक नागपूर परिक्षेत्र दिलीप भुजबळ, पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, अपर पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण रमेश धुमाळ, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल म्हस्के, सावनेर ठाणेदार उमेश पाटील, कळमेश्वर ठाणेदार मनोज काळबांडे, स्वयंभू श्री विठ्ठल -रूक्मिणी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष रुद्रप्रतापसिंह पवार, सचिव आदित्यप्रतापसिंह पवार, भानुप्रतापसिंह पवार, पोलिस पाटील धापेवाडा निलेश डेरे, राजेश शेटे, मंगेश कोठाडे, शितल सवईतूल, आणि गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आषाढी यात्रा ; विठू नामाच्या गजराने विदर्भातील पंढरी दुमदुमली विठुरायाच्या दर्शनाला धापेवाड्यात उसळला महासागर









