spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

सावित्रीच्या विचारांचा जागर: बेला येथील वृद्धाश्रमात रंगला ओबीसी क्रांती मोर्चाचा आगळावेगळा हळदी-कुंकू सोहळा

हंसराज, प्रतिनिधी भंडारा :- क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी हळदी-कुंकू या कार्यक्रमाला केवळ एक धार्मिक विधी न मानता, स्त्रियांच्या सामाजिक परिवर्तनाचे आणि जागृतीचे साधन बनवले होते. याच विचारांचा वारसा पुढे नेत, ‘भंडारा जिल्हा ओबीसी क्रांती मोर्चा’च्या वतीने बेला येथील वृद्धाश्रमात जाऊन ज्येष्ठ मातांसोबत हळदी-कुंकू कार्यक्रम साजरा करण्यात आला. परंपरेला माणुसकी आणि समतेची नवी जोड देत या उपक्रमाने वृद्धाश्रमातील महिलांच्या जीवनात आनंदाचे क्षण फुलवले.

ज्या काळात स्त्रियांना उंबरठ्याबाहेर पडण्याची बंदी होती, त्या काळात सावित्रीबाईंनी हळदी-कुंकूच्या निमित्ताने स्त्रियांना एकत्र आणले. त्यांनी या व्यासपीठाचा वापर शिक्षण, स्वाभिमान आणि समानतेवर चर्चा करण्यासाठी केला. अंधश्रद्धा, बालविवाह, केशवपन आणि विधवांवरील अन्याय याविरोधात आवाज उठवत त्यांनी विधवांना सन्मानाने हळदी-कुंकू लावून सामाजिक गुलामगिरीच्या बेड्या तोडल्या होत्या. याच ऐतिहासिक विचारांची प्रेरणा घेऊन हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

बेला येथील वृद्धाश्रमात अशा अनेक माता आहेत, ज्यांना त्यांच्या पोटच्या मुलांनी उतारवयात आधार देण्याऐवजी एकाकी सोडले आहे. ज्या आईने स्वतःच्या रक्ताचे दूध पाजून, कष्ट सोसून मुलांचे संगोपन केले, त्याच मुलांना आज आपल्या आईची अडचण वाटू लागली आहे. समाजातून एकाकी पडलेल्या या मातांना ‘आम्ही तुमच्या पाठीशी आहोत’ असा विश्वास देण्यासाठी ओबीसी क्रांती मोर्चाने हा उपक्रम राबविला.

वृद्धाश्रमातील या महिलांना सन्मानाने हळदी-कुंकू लावून त्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी महिलांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले. “हळदी-कुंकू म्हणजे केवळ सौभाग्य नसून तो समता, माणुसकी आणि आत्मसन्मानाचा प्रतीक आहे,” हा संदेश या निमित्ताने समाजात पोहोचवण्यात आला.

या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमामुळे वृद्धाश्रमातील वातावरण भावूक आणि उत्साही झाले होते. ओबीसी क्रांती मोर्चाच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. सामाजिक परिवर्तनासाठी अशा प्रकारच्या कार्यक्रमांची गरज असल्याचे मत यावेळी उपस्थितांनी व्यक्त केले.

Popular Articles