spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

रामटेकच्या रेल्वे प्रश्नांना बर्वेंचा ‘बूस्टर’!

– बंद रेल्वेगाड्या सुरू करण्यासह गोधनी, बोकारा क्रॉसिंग, बुटीबोरी अंडरब्रिजच्या प्रश्नांवर तातडीच्या उपाययोजनांची मागणी

संदीप कांबळे,कामठी :- रामटेक लोकसभा क्षेत्रातील रेल्वे प्रवाशांच्या प्रलंबित प्रश्नांना आता खासदार श्यामकुमार दौलत बर्वे यांनी मध्य रेल्वे प्रशासनाच्या बैठकीत जोरदारपणे वाचा फोडली. कोरोना काळापासून बंद असलेल्या रेल्वेगाड्या तातडीने पूर्ववत सुरू करण्यापासून ते गोधनी रेल्वे स्थानकाच्या विकासापर्यंत विविध महत्त्वपूर्ण मागण्या त्यांनी रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर ठामपणे मांडल्या.

नागपूर येथील मध्य रेल्वे कार्यालयात झालेल्या सांसद सदस्यांच्या बैठकीत काटोल–नरखेड रेल्वेमार्गावरील प्रवासी सुविधांचा प्रश्न प्राधान्याने उपस्थित करण्यात आला. या मार्गावर कोरोना काळात बंद झालेल्या रेल्वेसेवा अद्याप पूर्ववत न झाल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. त्यामुळे बंद गाड्या पुन्हा सुरू करण्याची मागणी बर्वे यांनी केली.

यासोबतच गोधनी रेल्वे स्थानकाचा विकास, बोकारा क्रॉसिंगची समस्या आणि बुटीबोरी अंडरब्रिजचा प्रश्न यावरही सविस्तर चर्चा झाली. रामटेक लोकसभा क्षेत्रातील प्रवाशांना सुरक्षित, सुलभ आणि सक्षम रेल्वे सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रलंबित प्रश्नांवर तातडीने कार्यवाही करण्याची मागणी खासदार बर्वे यांनी केली.

उत्तर भारतासाठी अतिरिक्त रेल्वेसेवेचा मुद्दा ऐरणीवर

नागपूर शहर व परिसरात मोठ्या संख्येने वास्तव्यास असलेल्या उत्तर भारतीय नागरिकांच्या प्रवासाची गरज लक्षात घेऊन नागपूरहून उत्तर भारतातील प्रमुख शहरांसाठी अतिरिक्त रेल्वेगाड्या सुरू करण्याची मागणीही बर्वे यांनी केली. त्यामुळे नागपूरसह रामटेक परिसरातील प्रवाशांना अधिक रेल्वे पर्याय उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

दीक्षाभूमीसाठी विशेष रेल्वेगाड्यांची मागणी

दरम्यान, नागपूरच्या ऐतिहासिक दीक्षाभूमीला भेट देण्यासाठी देशाच्या विविध भागांतून येणाऱ्या नागरिक व अनुयायांची संख्या लक्षात घेता, त्यांच्या सोयीसाठी विशेष रेल्वेगाड्या उपलब्ध करून देण्याची मागणीही बैठकीत करण्यात आली.

बैठकीस मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक राजीव श्रीवास्तव, विभागीय रेल्वे व्यवस्थापक विनायक गर्ग यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. खासदार बर्वे यांनी मांडलेल्या विविध मागण्यांवर आवश्यक कार्यवाही करण्याचे आश्वासन रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.