spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

सावधान! चंद्रपूर जिल्ह्याच्या बस स्थानकांवर ‘लेडी गँग’चा थरार; सुरक्षा यंत्रणा झाली ‘बिनकामाची’, प्रवाशांचे दागिने, खिसे होतायत फस्त, यंत्रणा आहे सुस्त!

चंद्रपूर :- जिल्ह्यात सध्या गुन्हेगारांचे धाबे दणाणले नसून, प्रवाशांचे धाबे दणाणले आहेत. चंद्रपूर जिल्ह्यासह उपविभागातील प्रमुख बस स्थानके आता चोरांच्या, विशेषतः ‘महिला चोरांच्या’ टोळीचे नंदनवन बनली आहेत. गेल्या महिनाभरात चोरीच्या घटनांत झालेली प्रचंड वाढ ही धोक्याची घंटा असून, धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

चंद्रपूर, बल्लारपूर, राजुरा, मूल, ब्रह्मपुरी आणि चिमूर… या सहाही प्रमुख शहरांमधील बस स्थानकांवर या महिला चोरांनी धुमाकूळ घातला आहे. या टोळीतील महिला अत्यंत सराईतपणे काम करतात. बसमध्ये चढताना होणाऱ्या गर्दीचा फायदा घेणे किंवा बस स्थानकावर बसलेल्या महिला प्रवाशांच्या शेजारी बसून गप्पांच्या ओघात लक्ष विचलित करणे, ही यांची जुनीच पण यशस्वी पद्धत आहे. नजर चुकली की काही सेकंदात दागिने आणि रोख रक्कम असलेली पर्स गायब केली जाते.

ब्रह्मपुरी आणि बल्लारपुरात मोठे डल्ला; लाखांचे दागिने लंपास!

चोरीचा आकडा ऐकून सामान्यांच्या अंगावर काटा येईल. ब्रह्मपुरी तालुक्यात एका महिला प्रवाशाचे तब्बल ३ लाख ७५ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने भरदिवसा लंपास करण्यात आले. काही दिवसा अगोदर सुद्धा बल्लारपूर बस स्थानकावर एका महिलेची बॅग पळवून त्यातले ४० हजार रुपये रोख आणि सोन्याचे दागिने लंपास करण्यात आले. ही आकडेवारी केवळ हिमनगाचे टोक आहे; अशा अनेक चोऱ्यांची नोंद तर भीतीपोटी किंवा त्रासामुळे पोलीस दफ्तरी होतच नाही. सर्वात संतापजनक बाब म्हणजे चंद्रपूर बस स्थानक परिसरात चोरांचा सुळसुळाट वाढला असताना, तेथील सुरक्षा यंत्रणा पूर्णपणे ‘बिनकामाची’ ठरत आहे. बस स्थानक परिसरात पोलीस चौकी आहे, खाकी वर्दीचा पहारा आहे, तरीही चोरांच्या मनात कायद्याचा कोणताही धाक उरलेला नाही. आणि खाजगी सुरक्षा रक्षक फक्त वाहणावर वरच पहारा देत आहे.

खाजगी सुरक्षा रक्षकांचे नेमके काम काय?

स्थानकावर तैनात असलेले सुरक्षा रक्षक नेमके काय करतात, असा संतप्त सवाल प्रवाशांकडून विचारला जात आहे. सीसीटीव्ही आणि गस्त कागदावरच? जर पोलीस चौकी समोरून चोऱ्या होत असतील, तर गस्त कोणासाठी घातली जाते? असा सवाल उपस्थित करून संतप्त नागरिकांनी येथील कुचकामी सुरक्षा रक्षकांना तातडीने बदलण्याची मागणी लावून धरली आहे.

प्रवाशांच्या जीवावर बेतलेली ‘अंधेरी नगरी’!

बस स्थानकावर पाकीटमारांची संख्या इतकी वाढली आहे की, सामान्य माणसाने खिशात हात घालून चाचपणी केल्याशिवाय बसमधून उतरणे कठीण झाले आहे. महिला प्रवाशांच्या दागिन्यांवर या टोळीची विशेष वक्रदृष्टी आहे. एकीकडे एसटी महामंडळ प्रवासी वाढीसाठी प्रयत्न करत असताना, दुसरीकडे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा मात्र पुरता ‘फज्जा’ उडाला आहे. जिल्हा पोलीस प्रशासन आणि एसटी महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी या गंभीर बाबीकडे डोळेझाक का करत आहेत? ब्रह्मपुरी आणि बल्लारपूरच्या घटनांनंतर तरी यंत्रणा जागी होणार का? का अजून मोठ्या चोरीची वाट पाहत आहे?

प्रवाशांना सावधानता बाळगण्याचे आवाहन: जोपर्यंत प्रशासन ठोस पावले उचलत नाही, तोपर्यंत दागिने आणि मौल्यवान वस्तू सांभाळण्याची जबाबदारी स्वतः प्रवाशांचीच आहे. गर्दीत कोणावरही विश्वास ठेवू नका आणि संशयास्पद हालचाली दिसताच आरडा ओरड करा.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.