spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

भंडारा: ट्युशन गल्लीतील टॉवरखालील अवैध बांधकामावर प्रशासन मेहेरबान? ‘क्राईम इंडिया न्यूज’चा आक्रमक पवित्रा

हंसराज भंडारा :- भंडारा शहरातील ट्युशन गल्ली परिसरातील हाय व्होल्टेज टॉवरलाईनखाली सुरू असलेल्या अवैध बांधकामाचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. नगर परिषद प्रशासनाने नोटीस बजावूनही संबंधित अतिक्रमणधारकाने बांधकाम न काढल्याने, प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याप्रकरणी ‘क्राईम इंडिया न्यूज’चे संपादक शमशेर खान यांनी आक्रमक पवित्रा घेत मुख्याधिकाऱ्यांना निवेदन सादर केले असून, तात्काळ कारवाई न झाल्यास उच्चस्तरावर दाद मागण्याचा इशारा दिला आहे.

नेमके प्रकरण काय? ट्युशन गल्ली येथील टॉवरलाईनच्या खाली अवैधरित्या बांधकाम करून अतिक्रमण केले आहे. या गंभीर प्रकाराची दखल घेत भंडारा नगर परिषदेने दिनांक २४ जून २०२६ रोजी नोटीस (क्रं. नपभं/नरवि/अनधिकृत बांधकाम/नोटीस/२१२०/२०२६) बजावली होती. सदर नोटीसमध्ये हे अवैध बांधकाम स्वतःहून काढून घेण्याचे निर्देश देण्यात आले होते. मात्र, दोन महिने उलटूनही संबंधित अतिक्रमणधारकाने या नोटिशीला केराची टोपली दाखवत बांधकाम जैसे थे ठेवले आहे.

जिवितहानीची टांगती तलवार टॉवरलाईनखालील अवैध बांधकामामुळे भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. हाय व्होल्टेज विद्युत तारांच्या खाली अशा प्रकारचे बांधकाम करणे कायद्याने गुन्हा तर आहेच, शिवाय यामुळे रहिवाशांच्या जीवाला मोठा धोका निर्माण झाला आहे. कोणतीही प्राणहानी किंवा जीवितहानी टाळण्यासाठी हे बांधकाम तातडीने जमीनदोस्त करणे आवश्यक असल्याचे तक्रारदाराने पत्रात नमूद केले आहे.

प्रशासनाचे ‘साटलोटं’ असल्याचा संशय? ‘क्राईम इंडिया न्यूज’ने यापूर्वीही या अवैध बांधकामाबाबत वृत्त प्रसिद्ध करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते. मात्र, नगर परिषद प्रशासनाकडून केवळ कागदी घोडे नाचवले जात असून प्रत्यक्ष कारवाई केली जात नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. जर प्रशासनाने वेळेत कारवाई केली नाही, तर नगर परिषद प्रशासन आणि अतिक्रमणधारक यांच्यात ‘साटलोटं’ किंवा अर्थपूर्ण संबंध आहेत का? असा प्रश्न संपादक शमशेर खान यांनी उपस्थित केला आहे.

या पत्राद्वारे मुख्याधिकाऱ्यांना संबंधित अतिक्रमणधारकावर कायदेशीर कारवाई करण्याची विनंती करण्यात आली आहे. जर नगर परिषदेने याकडे दुर्लक्ष केले, तर या प्रकरणाची उच्चस्तरावर तक्रार करण्यात येईल , असा इशारा ‘क्राईम इंडिया न्यूज’च्या वतीने देण्यात आला आहे. आता यावर नगर परिषद प्रशासन काय पाऊल उचलते, याकडे संपूर्ण भंडारा शहराचे लक्ष लागले आहे.

Popular Articles